कलावंतांची जबाबदारी पूर्णत: राज्यशासनाची : प्रेमानंद गज्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:29 PM2019-07-27T23:29:13+5:302019-07-27T23:30:35+5:30
नाट्य परिषद म्हणा वा अन्य कोणत्याही कलावंतांच्या संस्था, कलावंतांवर विसंबून असतात. मात्र, कलावंतांची जबाबदारी कुणी घ्यावी... हा प्रश्न आहे. कलावंत वाऱ्यावरच राहतील का? कोणताही कलावंत जगावा ही राज्यशासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करावी... अशी भावना ज्येष्ठ नाटककार व ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाट्य परिषद म्हणा वा अन्य कोणत्याही कलावंतांच्या संस्था, कलावंतांवर विसंबून असतात. मात्र, कलावंतांची जबाबदारी कुणी घ्यावी... हा प्रश्न आहे. कलावंत वाऱ्यावरच राहतील का? कोणताही कलावंत जगावा ही राज्यशासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करावी... अशी भावना ज्येष्ठ नाटककार व ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली.
कलावंत जगला पाहिजे, त्यासाठी काय करावे?
कलावंत रसिकांच्या मनोरंजनाची आणि विद्वत्तेची भूक भागवतो. मात्र, असे करताना त्याच्या खिशात दीड दमडीही राहत नाही. तो जगेल तरच कला जिवंत राहतील. म्हणून, प्रत्येक कलावंताला शासनाकडून एक घर मिळायला हवे, तो घर चालवू शकत असेल तरच कलेसाठी वेळ देऊ शकतो म्हणून, त्याच्या खात्यात दहा लाख ठेवीस्वरूपात शासनानेच ठेवायला हवे आणि त्याच्या व्याजातून तो घर चालवू शकेल. त्याला त्याच्या प्रत्येक संशोधन कार्यात वा कलाविष्कारासाठी फेलोशिप मिळायला हवी.
नाट्य परिषदेच्या कामावर संतुष्ट आहात का?
बिल्कूल नाही.. नाट्य परिषद काम करीत नाही, ही तक्रार माझी स्वत:ची आहे. आज परिषदेच्या ६२ शाखा बृहन्महाराष्ट्रात आहेत. मात्र, अनेक शाखा बंद पडल्या आहेत. मध्यवर्तीने विविध उपक्रमांसाठी परिषदेच्या शाखांना निधी उपलब्ध करून द्यावा. मात्र, नाट्य परिषदेला सरकारकडून किती अनुदान मिळते, याबाबत कुणालाच काही सांगता येत नाही. तेव्हा शासनानेही याकडे लक्ष पुरवावे.
नाट्य लेखिकांची संख्या कशी वाढेल?
नाटक वगळता साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात महिला लेखिका पुढे येत असल्याचे दिसून येते. यावरून नाटकासाठीच्या चिंतनाबाबत महिला कुठेतरी कमी पडत असल्याचे स्पष्ट होते. त्यासाठी कार्यशाळा घेत आहोत. नागपुरात महिला लेखिकांची कार्यशाळा आयोजित केली जाते, महिला नाट्य महोत्सव घेतले जातात. मात्र, त्याचा प्रभाव पुणे-मुंबईकडे पडायला हवा... तसे होत नाही. त्याअनुषंगाने महिला नाट्य लेखिकांच्या अभिव्यक्तीला चिंतनाची धार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नाट्य संस्थांकडून उपक्रम होत नाही, त्याबाबत...
नाट्य संस्थांकडून उपक्रम होत नाही, ही बाब खरी आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न व्हायला हवे. त्यासाठी नाट्य परिषदेच्या शाखांनी पुढाकार घ्यावा आणि नाट्य संस्था शासनदरबारी नोंदणीकृत होतील, याचे प्रयत्न करावे. उपक्रमांसाठी प्रत्येक नोंदणीकृत नाट्य संस्थेला विशेष तरतुदीअंतर्गत दरसाल ५० हजार रुपये अनुदान द्यावे आणि उपक्रमांचा आराखडा सादर करण्यास बाध्य करावे. तर आपोआप नाट्य संस्थांना उभारी मिळेल. शेवटी कलावंतांना पैसा लागतो आणि त्याशिवाय कोणतेच उपक्रम होत नाही, हे सत्य आहे.
अध्यक्ष या नात्याने कोणते प्रयत्न सुरू आहेत?
संमेलनाध्यक्ष असल्यापासून पुणे, एरोली, नाशिक, कोल्हापूर व अहमदनगर येथे नाट्यलेखन कार्यशाळा घेतल्या आहेत. नागपुरात ही सहावी कार्यशाळा आहे. मात्र, त्यासाठीचा निधी अपुरा पडतो. मला अध्यक्ष या नात्याने मिळालेल्या निधीतून ते शक्य नाही, तरीदेखील स्थानिक शाखांच्या मदतीने घेतो आहे.