तोकड्या मनुष्यबळावर गुन्हेगारांच्या वस्तीची जबाबदारी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:14+5:302021-06-21T04:07:14+5:30

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमधील अंतर्गत वाद धुमसत ...

Responsibility for criminal settlement on limited manpower () | तोकड्या मनुष्यबळावर गुन्हेगारांच्या वस्तीची जबाबदारी ()

तोकड्या मनुष्यबळावर गुन्हेगारांच्या वस्तीची जबाबदारी ()

Next

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमधील अंतर्गत वाद धुमसत आहे. जीव धोक्यात घालून कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी आतमधील सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहेत. मात्र, एकापेक्षा एक असे अनेक खतरनाक गुन्हेगार आतमध्ये एकमेकांशी खुन्नस ठेवून वागत असल्याने कोणत्याही क्षणी आतमध्ये मोठा धोका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या खुनी हल्ल्याच्या घटनेतून पुन्हा एकदा हा धोका अधोरेखित झाला आहे.

ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेले येथील मध्यवर्ती कारागृह सात वर्षांपूर्वीपर्यंत देशातील सर्वात सुरक्षित कारागृह म्हणून ओळखले जायचे. मात्र, २०१४ मध्ये कारागृहाची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याने ‘पैशासाठी वाट्टेल ते’ करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे कैद्यांना चिकन, मटन, दारू, गांजा, चरस, मिठाई, बर्थ डे केक, मोबाईल फोन उपलब्ध करून दिले जाऊ लागले. कारागृहातच जुगारही भरू लागला. लोकमतने कारागृहात स्टींग ऑपरेशन करून हा गैरप्रकार उघड केला. त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. काही अधिकाऱ्यांवर निलंबनाचीही कारवाई झाली. मात्र, प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई न झाल्यामुळे पुन्हा काही दिवसांनी जैसे थेच सुरू झाले. बोकाळलेल्या कैद्यांनी २०१५ मध्ये ‘जेल ब्रेक’ केला. देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहाच्या सुरक्षेची पुरती वाट लागल्याने सरकारने त्यावेळी तत्कालीन अधीक्षकांसह डझनभर अधिकाऱ्यांवर निलंबनाचा आसूड ओढला. त्यानंतर येथे कारागृह अधीक्षक म्हणून योगेश देसाई आले. त्यांनी कारागृहाला खऱ्या अर्थाने शिस्त लावली. त्यानंतर मनीषा भोसले आल्या. आता दोन वर्षांपासून येथे अनुपकुमार कुमरे अत्यंत चांगल्या आणि कर्तव्यकठोर उपाययोजना राबवित आहे. मात्र, खरी समस्या मनुष्यबळाची आहे.

१७०० ची क्षमता, प्रत्यक्षात २५०० कैदी

- १७०० कैद्यांची क्षमता असलेल्या मध्यवर्ती कारागृहात २३०० ते २५०० कैदी आहेत. त्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तसेच मुंबई अंडरवर्ल्डमधील अनेक खतरनाक गुंड, बॉम्बस्फोटाचे दहशतवादी, नक्षलवादी आणि राज्यात ठिकठिकाणी टोळ्या चालविणारे गँगस्टर आदींचा समावेश आहे. त्यात रोज २० ते २५ कैद्यांची भर पडते.

- कैद्यांची कोर्टाची पेशी, कुणाची मुलाखत, अनेकांची नातेवाईकांसोबत भेट, फोनवर बोलणी, त्यांची आवकजावक आणि रात्रंदिवस कारागृहाच्या आतबाहेरची रात्री आणि दिवसाची (दोन पाळीत) सुरक्षा सांभाळण्यासाठी केवळ २३ अधिकाऱ्यांसह एकूण २५० जणांचे मनुष्यबळ आहे.

- अर्थात एका पाळीत केवळ १२५ जणांचेच संख्याबळ. त्यापैकी साप्ताहिक सुटी, आजारी, नैमित्तिक रजा अन् बाहेरची काम लक्षात घेतल्यास प्रत्यक्षात फक्त १०० जणच कर्तव्य बजावू शकतात.

--------------

२५ गुन्हेगारांना एक जण कसा सांभाळणार?

सरासरी हिशेब काढला तर एकापेक्षा एक खतरनाक असलेल्या २५ गुन्हेगारांना सांभाळण्याची जबाबदारी केवळ एका कर्मचाऱ्यावर येते. येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मंजूर संख्याबळ ३६० जणांचे आहे. मात्र, त्यातील सुमारे १०० पदे रिक्तच आहेत. सुरक्षेचे हे तोकडे मनुष्यबळ असेच राहिल्यास मध्यवर्ती कारागृहात कधीही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

------------------५ वर्षांमधील बहुचर्चित घडामोडी

मार्च २०१५ - जेल ब्रेक, सुरक्षा व्यवस्था भेदून ५ कैदी पळाले

जुलै २०१५ - दहशतवादी याकूब मेमनला फाशी

सप्टेंबर २०१७ - आयुष पुगलिया नामक गुन्हेगाराची हत्या

२०२० - आबू खान नामक कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

एप्रिल २०२१ - कैद्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

जून - २०२१ - गुन्हेगार रोशन शेखचा आत्महत्येचा प्रयत्न

१९ जून २०२१ - तिघांवर खुनी हल्ला

---

Web Title: Responsibility for criminal settlement on limited manpower ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.