पार्किंगमधील धडकेवरून राडा, रेस्टॉरेन्टमालक अन् वकील भिडले
By योगेश पांडे | Updated: April 9, 2025 20:11 IST2025-04-09T20:11:15+5:302025-04-09T20:11:56+5:30
दोघांकडून एकमेकांविरोधात तक्रार : वकिलाविरोधात पोलीस कर्मचाऱ्याचीदेखील धमकी व शिवीगाळीची तक्रार

पार्किंगमधील धडकेवरून राडा, रेस्टॉरेन्टमालक अन् वकील भिडले
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : अपार्टमेंटमधील एका व्यक्तीच्या कारला कुणीतरी धडक देऊन स्क्रॅचेस पाडल्यामुळे जोरदार राडा झाला. यात एक रेस्टॉरेन्टचालक व वकिलाने एकमेकांविरोधात तक्रार केली असून पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केला आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणा एक्झॉटिका अपार्टमेंट येथे ही घटना घडली.
पहिल्या गुन्ह्यात ॲड.नितेश समुन्द्रे (४२) असे तक्रारदाराचे नाव आहेन्तर कडबी चौकातील जॅक ॲंड जील रेस्टॉरेन्टचा मालक जगदीश पारवानी (४२) व साथीदार आरोपी आहेत. ६ एप्रिल रोजी अपार्टमेंटमधील मयूर नावाच्या व्यक्तीच्या कारला कुणीतरी धडक दिली. त्यांनी समुन्द्रेला याची माहिती दिली. त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता पारवानीने हे नुकसान केल्याची बाब समोर आली. सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा प्रकार टाकण्यात आला. दुसऱ्या दिवशी परत सोसायटीतील लोक गार्डरूममध्ये फुटेज पाहण्यासाठी गेले असता ते डिलीट झाले होते. काही वेळ अगोदर पारवानी साथीदारांसोबत पोहोचल्याची माहिती गार्डने दिली. ७ एप्रिल रोजी रात्री १० वाजता पार्किंगमध्ये यावरून वाद सुरू झाला. समुन्द्रेने मोबाईलमधील फुटेज दाखविल्यावर पारवानीने सहकाऱ्यांना हल्ला करण्याची सूचना केली. आरोपींनी समुन्द्रेला लोखंडी रॉडने मारहाण केली. इतर रहिवाशांनी मध्यस्थी केली. त्यानंतर समुन्द्रेंच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी उपचारासाठी मेयो इस्पितळात नेले. समुन्द्रेंच्या तक्रारीवरून पारवानी व चार ते पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी तक्रार जगदीश पारवानीने केली. ७ एप्रिल रोजी रात्री घरी असताना शेजारी मयूर यांनी त्यांना पार्किंगमध्ये बोलविले. मयूर यांच्या कारला कुणीतरी धडक दिली होती. त्याबाबत विचारणा केली असता आपल्याला काहीच माहिती नसल्याची भूमिका पारवानीने घेतली. मात्र त्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नितेश समुन्द्रेने पारवानीनेच धडक मारल्याचा दावा केला. याबाबत पुरावा काय आहे असे पारवानीने विचारले असता समुद्रेनी शिवीगाळ सुरू केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पारवानीला मारहाण सुरू केली. त्याचवेळी पारवानीच्या हॉटेलमधील कर्मचारी प्रफुल्ल जगताप (१९) हा जेवणाची डिलिव्हरी घेऊन आला होता. हा प्रकार पाहून त्याने मध्यस्थी करण्यासाठी धाव घेतली. मात्र समुन्द्रेने त्यालादेखील मारहाण केली व लाकडी दांड्याने डोक्यावर प्रहार केला. यात प्रफुल्ल जखमी झाला. त्यानंतर पारवानीने जरीपटका पोलीस ठाणे गाठले. पोलीस प्रफुल्लला उपचारासाठी मेयो इस्पितळात घेऊन गेले. पारवानीच्या तक्रारीवरून ॲड.समुन्द्रेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात वकिलाचा राडा
दरम्यान, ॲड.नितेश समुन्द्रेने पोलीस ठाण्यातदेखील राडा घातला. पोलीस उपनिरीक्षक सचिन खुटवड यांनी केलेल्या तक्रारीवरून समुन्द्रे व दोन ते तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी खुटवड यांची रात्रपाळी होती. समुन्द्रे ८ एप्रिल रोजी दिवसा ८ ते १० वकिलांसोबत पोहोचल्यावर खुटवड तेथे नव्हते. मात्र रात्रपाळी असतानादेखील ते तरीदेखील पोहोचले. तक्रार नोंदवून घेत असताना मी सहा तासांपासून बसलो आहे, तुम्ही काय झक मारत आहात का या शब्दांत समुन्द्रेने अरेरावी केली. तुम्हाला मीच वारंवार तक्रारीसाठी बोलविले आहे असे खुटवड यांनी म्हटल्यावर मी बार कॉन्सिलचा सदस्य आहे व तुझी नोकरी खाऊन टाकील अशी धमकी देत समुन्द्रेने खुटवड यांना ठाण्यातच धक्काबुक्की केली. समुन्द्रेसोबतच्या तीन वकिलांनीदेखील शिवीगाळ केल्याची तक्रार खुटवड यांनी केली.