ई-कॉमर्स कंपन्यांच्या विक्रीवर प्रतिबंध आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:07 AM2021-05-27T04:07:23+5:302021-05-27T04:07:23+5:30
नागपूर : कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या कारणांनी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंची विक्री वगळता सर्व वस्तूंच्या ...
नागपूर : कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या कारणांनी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंची विक्री वगळता सर्व वस्तूंच्या विक्रीवर बंदी आहे. पण या काळातही देश-विदेशातील ई-कॉमर्स कंपन्या सरकारी नियमांचे उल्लंघन करून अन्य वस्तूंची विक्री करीत आहेत. या कंपन्यांच्या विक्रीवर प्रतिबंध आणून मोबाईल विक्री थांबवावी, अशी मागणी रिटेल मोबाईल विक्रेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात ऑल इंडिया मोबाईल रिटेल असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले. असोसिएशनचे अध्यक्ष कैलास लखनानी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन चर्चा केली आहे. पदाधिकाऱ्यांनी सांगितले, महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना राज्य शासनाने आवश्यक वस्तूंच्या विक्रीची परवानगी दिली आहे. त्यानंतरही या कंपन्या मोबाईल, अॅक्सेसरीज आणि अन्य अनावश्यक वस्तूंची विक्री करीत आहेत. त्यामुळे रिटेल मोबाईल विक्रेत्यांवर परिणाम झाला आहे. सरकारने यासंदर्भात कठोर कारवाई करावी. ही बाब मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला त्वरित सूचना करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी असोसिएशनच्या विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
मोबाईल विक्रीची दुकाने बंद असल्याने वीज बिलात निश्चित आकार शुल्कात सूट देण्याची मागणी असोसिएशनने केली. रिटेलर्स आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. त्यामुळे पुढे दुकानात ग्राहक येतील आणि सुरक्षितरीत्या खरेदी करतील.