उपाहारगृहातील चोरीचा १२ तासात लावला छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:06 AM2021-06-21T04:06:54+5:302021-06-21T04:06:54+5:30
नागपूर : नोकरावर विश्वास ठेवून इतवारी रेल्वेस्थानकावर कॅन्टीन असलेल्या मालकाने त्याला कॅन्टीन चालविण्यास दिले. परंतु नियत फिरल्यामुळे नोकराने कॅन्टीनमधील ...
नागपूर : नोकरावर विश्वास ठेवून इतवारी रेल्वेस्थानकावर कॅन्टीन असलेल्या मालकाने त्याला कॅन्टीन चालविण्यास दिले. परंतु नियत फिरल्यामुळे नोकराने कॅन्टीनमधील रोख रक्कम आणि इतर साहित्याची चोरी केली. इतवारी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या १२ तासात आरोपीला गजाआड केले आहे. यु ट्युबवरील व्हिडीओ पाहून चोरीची कल्पना सुचली अशी माहिती आरोपीने लोहमार्ग पोलिसांना दिली आहे.
शिवनारायण चतुर्वेदी (३१) रा. इतवारी रेल्वे क्वॉर्टर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. विजय मिश्रा (४०) यांचे इतवारी रेल्वेस्थानकावर कॅन्टीन आहे. या ठिकाणी शिवनारायण कामाला होता. बऱ्याच वर्षांपासून काम करीत असल्याने त्याच्यावर मिश्रा यांचा विश्वास होता. त्याच्या भरवशावर ते कॅन्टीन सोडून जायचे. आठवडाभरापूर्वी विजय मिश्रा हे आपल्या मूळ गावी गेले. ही संधी साधून शिवनारायणनने शुक्रवारी कॅन्टीनमधुन ५ हजार रुपये रोख, डीव्हीडी आणि एलसीडीची चोरी केली. त्याच दिवशी शिवनारायणने चोरीची तक्रार इतवारी लोहमार्ग पोलिस ठाण्यात केली. विशेष म्हणजे हे कॅन्टीन इतवारी रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. कॅन्टीनसमोर आरपीएफ आणि जीआरपी असे दोन पोलिस ठाणे आहेत. चोरीची माहिती विजय मिश्रा यांना देण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. सुरूवातीला पोलिसांनी एक दोन लोकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यामुळे मूळ चोर असलेला शिवनारायण बिनधास्त झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना चुकीचा पत्ता सांगितला. पोलिसांनी त्याच दिवशी रात्री त्याचा खरा पत्ता शोधून घरूनच त्याला अटक केली. चौकशीत त्याने चोरीची कबुली पोलिसांना दिली. पाच हजार रुपये गावाला पत्नीकडे पाठविले असून एलसीडी आणि डीव्हीडी झाडाझुडपात ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी शोध घेतला असता ते मिळाले नाही. त्याने विक्री केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. लोहमार्ग पोलिसांनी शिवनारायणला अटक करून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक राजेश वरठे, धम्मदीप गवई, सतीश बुरडे आणि अमित अवतारे यांनी केली.
............