खाद्य तेलाच्या पुनर्वापरावर निर्बंध : एफडीए करणार हॉटेल्सवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:23 AM2019-03-23T00:23:17+5:302019-03-23T00:27:07+5:30
हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड स्टॉलवर खाद्यान्न बनविण्यासाठी येणाऱ्या खाद्यतेलाचा वारंवार उपयोग करण्यात येत असल्याचे नेहमीच दिसून येते. वारंवार तेल गरम करून तयार करण्यात येणारे खाद्य पदार्थ आरोग्यास अपायकारक आहे. आता भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी यावर निर्बंध आणले असून त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड स्टॉलवर खाद्यान्न बनविण्यासाठी येणाऱ्या खाद्यतेलाचा वारंवार उपयोग करण्यात येत असल्याचे नेहमीच दिसून येते. वारंवार तेल गरम करून तयार करण्यात येणारे खाद्य पदार्थ आरोग्यास अपायकारक आहे. आता भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी यावर निर्बंध आणले असून त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे.
प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता दररोज ५० लिटर खाद्यतेलाचा उपयोग करणाऱ्या हॉटेल्सला तेलाची खरेदी, उपयोग आणि तेल कितीदा गरम केले, याचा रेकॉर्ड ठेवावा लागणार आहे. याशिवाय तेलामध्ये पोलर कम्पाऊंड २५ डिग्रीपेक्षा जास्त असेल तर त्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई, शिवाय परवाना रद्द करण्याचा अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला आहे. विभागातर्फे हॉटेल्सची आकस्मिक तपासणी करून डिजिटल यंत्राद्वारे तेलातील पोलर कम्पाऊंडची मात्रा तपासण्यात येणार आहे. पण विभागाकडे असलेले मनुष्यबळ पाहता नागपुरातील किती हॉटेल्सची तपासणी होईल, हा गंभीर प्रश्न आहे. फूटपाथवर खाद्यविक्रेते खाद्यतेल तीनपेक्षा जास्त वेळ गरम करून त्यात खाद्यपदार्थ तळतात. त्यांची रोजची खपत ५० लिटरपेक्षा कमी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार वा नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र, प्राधिकरणाच्या आदेशामुळे हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खाद्यतेलात तयार होतात पोलर कम्पाऊंड
खाद्य तेल तीनपेक्षा जास्त वेळ गरम केले तर त्यात पोलिमरायझेनची प्रक्रिया होण्यास सुरुवात होते. त्यानंतर त्यात ट्रान्सफॅट तयार होतात. ट्रान्सफॅटी अॅसिड शरीरासाठी घातक आहेत. यावर प्रतिबंध म्हणून प्राधिकरणाने आदेश दिले असून काटेकोर अंमलबजावणी झाल्यास नागपूरकरांच्या आरोग्यासाठी हितकारक ठरणार आहे.
पोलर कम्पाऊंडची डिजिटल यंत्राद्वारे तपासणी
तळलेल्या तेलात २५ डिग्रीपेक्षा जास्त आढळलेले पोलर कम्पाऊंड आरोग्यासाठी घातक आहे. हॉटेल्समध्ये साठविलेल्या तळलेल्या तेलाची अन्न प्रशासन विभागाकडून आकस्मिक तपासणी करण्यात येणार आहे. तेल कितीवेळा तळण्यासाठी तापवले, याची तपासणी डिजिटल यंत्राद्वारे होणार आहे. तेलाचे नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येईल. त्यात जास्त पोलर घटक आढळलेल्या प्रकरणांची सुनावणी सहआयुक्तांकडे होणार आहे. यात दंडात्मक कारवाई किंवा हॉटेलचा खाद्य परवाना रद्द करण्याचा अधिकार सहआयुक्तांना आहे. वारंवार तळलेले तेल शासनातर्फे मान्यताप्राप्त एजन्सीला विकावे लागेल. या तेलापासून बायोडिझेल तयार करण्यात येणार आहे.
मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न),
अन्न व औषध प्रशासन विभाग.