नागपुरात परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध : मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 08:37 PM2020-11-24T20:37:13+5:302020-11-24T20:42:13+5:30
Restrictions on migrant travelers कोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरासाठी तर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी मंगळवारी काही निर्बंध लागू केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरासाठी तर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी मंगळवारी काही निर्बंध लागू केले आहेत. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी (टेस्ट रिपोर्ट) अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असेल. अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांना प्रवेश मिळेल. रिपोर्ट नसणाऱ्यांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. परराज्यातून विमान, रेल्वे, रस्ते मार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ही चाचणी अनिवार्य राहणार आहे. आज बुधवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राज्य शासनानेदेखील यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्याला अवगत केले आहे. प्रामुख्याने दिल्ली एनसीआर क्षेत्र, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल तपासणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत
यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य विभाग, पोलीस विभाग तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असणारी एक चमू गठित करण्यात आली आहे. या चमूने नागपूर जिल्ह्यात रेल्वेमार्गाने काटोल व नरखेड मार्गाद्वारे येणाऱ्या प्रवाशांची यादी रेल्वे विभागाकडून प्राप्त करून आरटीपीसीआर अहवाल तपासणीबाबतची कारवाई करावी, असे या रवींद्र ठाकरे यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच सावनेर, नरखेड, रामटेक या रस्ते मार्गाने नागपूर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा क्षेत्रावर तपासणी चौकी तयार करण्याचेदेखील निर्देश देण्यात आले आहेत.