शांत झोपेसाठी रात्रीच्या बांधकामावर निर्बंध
By admin | Published: February 19, 2016 02:51 AM2016-02-19T02:51:08+5:302016-02-19T02:51:08+5:30
नागपूर जिल्ह्यात सर्वच प्रकारच्या बांधकामांना आणि नुतनीकरणाच्या कामांवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई
नागपूर : नागपूर जिल्ह्यात सर्वच प्रकारच्या बांधकामांना आणि नुतनीकरणाच्या कामांवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत निर्बंध घातले आहे. आवाजाच्या प्रदूषणावर जनहित याचिका न्यायालयाने स्वत:हून स्वीकारून हे निर्देश दिले.
बांधकामांमुळे होणाऱ्या आवाज प्रदूषणाच्या संदर्भात एका वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त न्यायालयाने जनहित याचिका म्हणून स्वीकारले. या समस्येवर न्यायालयाने वारंवार राज्य सरकारकडे विचारणा करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे निर्देश न्यायालयाला द्यावे लागले.
बांधकामांमुळे होणाऱ्या आवाजामुळे परीक्षा देणारे विद्यार्थी त्रस्त होतात. नागरिकांना रात्री झोपता येत नाही. शाळेत जाणाऱ्या मुलांवरही याचा प्रभाव पडतो. ही बाब गंभीरपणे लक्षात घेऊन रात्री ८ ते सकाळी ८ या काळात कोणतेही बांधकाम किंवा नविनीकरणाचे काम होणार नाही, असे निर्देश जारी करीत आहो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
या पूर्वी हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला शहरात सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या संदर्भात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजाच्या प्रदूषणाबाबत शपथपत्र दोन आठवड्यात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वकील अॅड. रवी संन्याल यांनी, आवाज प्रदूषणावर राष्ट्रीय हरित लवादाने आणि मुंबईच्या मुख्य पीठाने गंभीर कारवाईचे निर्देश दिले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
यात रस्त्यावर फटाके फोडणे आणि वाद्य वाजविणे याचा समावेश आहे. (प्रतिनिधी)