नागपुरात निर्बंध कायम, दिलासा नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 11:34 PM2021-07-23T23:34:09+5:302021-07-23T23:34:56+5:30
Restrictions remain कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील, अशी नागरिक व व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र जिल्हा प्रशासनाने दिलासा दिलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील, अशी नागरिक व व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र जिल्हा प्रशासनाने दिलासा दिलेला नाही. ब्रेक द चेन अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीत जुने निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहू शकणार असून शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार आहेत.
जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आदेश जारी करत निर्बंध जैसे थे राहणार असल्याचे स्पष्ट केले. कोरोनाबाधितांचा दर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता लक्षात घेतली तर नागपूर लेव्हल-१ वर आहे. मात्र राज्य शासनाने संपूर्ण राज्यातच लेव्हल-३ चे निर्बंध लावले आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील निर्बंध पुढील आठवड्यातदेखील कायम राहतील.
कोरोना संसर्ग कमी झाला असल्याने व्यापाऱ्यांकडून दुकानांची वेळ वाढविण्याची मागणी होत होती. यासंदर्भात रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याचा प्रस्तावदेखील तयार झाला होता. मात्र आता असे होणार नाही. शनिवार व रविवारी तर केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहे. रेस्टॉरंटला दुपारी ४ वाजेपर्यंतच डाईन ईन सुविधेची परवानगी देण्यात आली आहे. होम डिलिव्हरी सुरू राहील. मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, धार्मिक स्थळे बंदच राहणार आहे. कार्यालयात ५० टक्के उपस्थितीची अट कायम ठेवण्यात आली आहे.