१४ तारखेपर्यंत निर्बंध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:08 AM2021-03-06T04:08:14+5:302021-03-06T04:08:14+5:30
शनिवार-रविवारी दुकाने-प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश कायम राहतील लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागपुरात ७ मार्चपर्यंत लावण्यात ...
शनिवार-रविवारी दुकाने-प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश कायम राहतील
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागपुरात ७ मार्चपर्यंत लावण्यात आलेले निर्बंध १४ मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहे. मनपा व जिल्हा प्रशासनाने या संदर्भात आदेश जारी केला आहे. संबंधित कालावधीत शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग, आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहतील, तसेच शनिवार व रविवारी दुकाने, प्रतिष्ठाने, हॉटेल रेस्टारंट बंद ठेवण्याचे आदेश पूर्वीप्रमाणेच कायम राहील. प्रशासनाला पूर्ण लॉकडाऊन लावायचा नाही. त्यामुळेच काही निर्बंध लावून कोरोनाला नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. १४ तारखेपर्यंत निर्बंध वाढविण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार शहरात कुठल्याही प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक सभा आदींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल रात्री ९ वाजेपर्यंतच खुले राहतील. रात्री ११ वाजेपर्यंत होम डिलीव्हरी सुरू राहील. कोरोनाचा प्रसार रोखणे, हाच या निर्बंधाचा खरा उद्देश आहे. बाजार आणि लग्न समारंभात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा पुन्हा प्रसार वाढला. त्यामुळे हे निर्बंध घालण्यात आले आहेत. साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कुणीही नियमांचे उल्लंघन केले, तर त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. सोबतच पोलीस कारवाईही होईल.
महत्त्वाचे निर्णय
----------
१४ मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालय, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्थान व अन्य समकक्ष संस्थान बंद राहतील. संबंधित काळात ऑनलाइन व्यवस्था सुरू राहील.
- या काळात धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी राहील.
- सभागृह, मंगल कार्यालय, लॉन आदी ठिकाणी होणाऱ्या लग्न समारंभावर बंदी राहील.
- कोणत्याही भागात आठवडी बाजार १४ पर्यंत बंद राहतील.
- सर्व बाजार शनिवार-रविवारी बंद राहतील. (अत्यावश्यक सेवा, वर्तमानपत्र, दूध, भाजीपाला, औषधी व पेट्रोल पंपसोडून) यावेळी सिनेमागृह व नाट्यगृहही बंद राहतील.
- हॉटेल-रेस्टोरेंट, उपहारगृह, दुकान व अन्य प्रतिष्ठान दररोज ५० टक्के क्षमतेसह रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात परवानगी राहील. हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये रात्री ११ वाजेपर्यंत होम डिलीव्हरीची सुविधेसाठी किचन सुरू ठेवले जातील.
- शहर सीमेतील सर्व वाचनालय, अभ्यासिका कक्ष ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येईल.
- स्वीमिंग पूल आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन बंद राहतील. नियमित सराव करण्यास मात्र अटी व शर्तींच्या अधीन राहून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.