नागपुरात निर्बंध कडक; पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 10:11 PM2022-01-05T22:11:30+5:302022-01-05T22:13:34+5:30

नागपुरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहर व शहराला लागून असलेल्या नागपूर ग्रामीणसह हिंगणा, कामठी, कळमेश्वर व सावनेर या तालुक्यातील शाळांसाठी हा निर्णय लागू राहील.

Restrictions tightened in Nagpur ; Schools from 1st to 8th closed till 31st January | नागपुरात निर्बंध कडक; पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

नागपुरात निर्बंध कडक; पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर शहर व नागपूर ग्रामीणसह हिंगणा, कामठी, कळमेश्वर, सावनेर तालुक्यातील शाळांचा समावेश मास्क बंधनकारक, दंडात्मक कारवाई होणार

नागपूर : कोरोना, तसेच ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने, नागपुरात निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत नागपुरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहर व शहराला लागून असलेल्या नागपूर ग्रामीणसह हिंगणा, कामठी, कळमेश्वर व सावनेर या तालुक्यातील शाळांसाठी हा निर्णय लागू राहील.

पालकमंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी विमला आर. आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात कोविड आढावा संदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सविस्तर आढावा घेतल्यानंतर उपरोक्त निर्णय घेण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती देताना पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, नागपुरातही कडक निर्बंध लागू राहतील. पुण्याच्या धर्तीवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईही अधिक कडक करण्यात येणार आहे. त्यानुसार, मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध ५०० रुपये दंड आकारला जाईल. खासगी, सार्वजनिक वाहनात प्रवास करताना मास्क अनिवार्य राहील. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क अनिवार्य राहील. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई होईल. तालुक्यांपासून तर शहरातील सर्व नियंत्रण कक्ष सुरू केले जातील.

- सुपर स्प्रेडर, मंगल कार्यालये, हॉटेल्स, रेस्टारंट यांच्यावर नजर

सुपर स्प्रेडर, सह मंगल कार्यालये, हॉटेल्स, रेस्टारंट यांच्यावर प्रशासनाची बारीक नजर राहणार आहे. सुपर स्प्रेडरचे लसीकरण झाले किंवा नाही, याची खातरजमा केली जाईल. त्यांची काेरोना चाचणी केली जाईल. यासाठी बाजारांमध्ये अँटिजन टेस्टची व्यवस्था केली जाईल. यासोबतच मंगल कार्यालये, हॉटेल्स, रेस्टारंट यांच्याकडून वारंवार नियमांची पायमल्ली होत असल्यास, त्यांच्यावर कारवाई करण्याचे, दंड वसुलीचे अधिकार पोलिसांना राहतील.

कार्यालयांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक

शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक राहील. ज्यांची टेस्ट निगेटिव्ह येईल, ते काम करतील व जे पॉझिटिव्ह येतील, त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविले जाईल, तसेच कार्यालयांमध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यात येईल. यासोबतच शाळा-महाविद्यालये, दुकाने, खासगी व शासकीय कार्यालयातील आस्थापनावरील सर्व अधिकारी कर्मचारी कामगारांना दोन लसीच्या मात्रा घेणे अनिवार्य राहील.

एम्स, मेडिकल व मेयोची पाहणी

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, पालकमंत्र्यांनी बुधवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन कोविड वार्ड, खाटांची संख्या, ऑक्सिजन प्लांट, मनुष्यबळ आदी बाबींची पाहणी केली. जिल्हाधिकारी आर.विमला, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ.विभा दत्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पातूरकर, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ.भावना सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. ओमायक्रॉन संक्रमितांची वाढती रुग्णसंख्या व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी ऑक्सिजन खाटा, आयसीयू कक्ष, बालकांसाठी स्वतंत्र वार्ड, ऑक्सिजनची उपलब्धता, तसेच अनुषंगिक सर्व वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Restrictions tightened in Nagpur ; Schools from 1st to 8th closed till 31st January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.