राजकीय स्वार्थातून घातले होते निर्बंध, केंद्राचा आताचा निर्णय लोकशाही बळकट करणारे पाऊल
By योगेश पांडे | Published: July 22, 2024 03:33 PM2024-07-22T15:33:04+5:302024-07-22T15:34:20+5:30
Nagpur : निर्बंध हटवण्याच्या निर्णयावरून संघाची भूमिका
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांत सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांनी सहभागी होण्याबाबतचे ५८ वर्षांअगोदर घातलेले निर्बंध केंद्र सरकारने हटविले आहे. या निर्णयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना संघाने मात्र देशाची लोकशाही बळकट करणारे हे पाऊल असल्याची भूमिका मांडली आहे.
संघाकडून अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी ही भूमिका मांडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मागील ९९ वर्षांपासून सातत्याने देशाच्या पुनर्निर्माण व समाजाच्या सेवेत कार्यरत आहे. राष्ट्रीय सुरक्षा, एकता-अखंडता तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी समाजाला सोबत घेऊन संघाने योगदान दिले आहे. देशातील विविध प्रकारच्या नेतृत्वाने संघाच्या या भूमिकेची वेळोवेळी प्रशंसादेखील केली आहे. राजकीय स्वार्थांमुळेच तत्कालिन सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांना संघासारख्या रचनात्मक संघटनेच्या कार्यांमध्ये भाग घेण्यासाठी अकारण निर्बंध लावले होते. वर्तमान केंद्र शासनाचा निर्णय समायोचित असून भारताच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देणारा आहे, असे आंबेकर यांनी स्पष्ट केले.