निर्बंधांमुळे कळमन्यात फळांची नासाडी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:07 AM2021-04-21T04:07:53+5:302021-04-21T04:07:53+5:30
नागपूर : कोरोना संसर्गाचा होणारा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मनपा आयुक्तांनी नागपुरात कठोर निर्बंध लावले आहेत. गर्दी होणार नाही याची खबरदारी ...
नागपूर : कोरोना संसर्गाचा होणारा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मनपा आयुक्तांनी नागपुरात कठोर निर्बंध लावले आहेत. गर्दी होणार नाही याची खबरदारी घेताना अनेक व्यावसायिकांना वेळेच्या मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यातच कोरोनाकाळात फळांची वाढलेली विक्री पाहता किरकोळ फळे विक्रेत्यांवर वेळेची मर्यादा आणण्याने कळमन्यात फळांची विक्री कमी होऊन नासाडी जास्त होणार असल्याचे मत कळमन्यातील अडत्यांनी व्यक्त केले आहे.
फळांच्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे. विक्रेत्यांनी कमी माल खरेदी केल्यास ही चेन तुटणार आहे. त्यांचा आर्थिक फटका पुरवठादार, व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसणार आहे. अर्थात लॉकडाऊनमुळे शेतकरीही हवालदिल होणार आहे.
कळमना फळे अडत असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, सध्या कळमन्यातून अन्य जिल्ह्यांत पुरवठा कमी झाल्याने सर्वच फळांची विक्री कमी झाली आहे. त्यातच सर्वाधिक विक्री नागपुरात होते, पण मनपा आयुक्तांच्या वेळेच्या निर्बंधामुळे आता विक्रीही कमी होणार आहे. विक्री आणि पुरवठ्याचे प्रमाण पाहता नागपूरलगतचे जिल्हे आणि राज्याच्या अन्य भागातून आणि राज्यांमधून फळांची आवक जास्त आहे, पण विक्री कमी झाल्यास फळे बाजारात पडून राहतील. खुल्या फळांचे जास्त आयुष्य नसते. फळे शीतगृहात ठेवण्याची कळमन्यात व्यवस्थाच नाही. त्यामुळे फळे मोठ्या प्रमाणात विक्रीविना पडून राहिल्याच्या फटका पुरवठादार आणि शेतकऱ्यांना बसणार आहे. सध्या आंब्याचा सिझन आहे. हैदराबाद आणि नागपूरलगतच्या जिल्ह्यांतून आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी हैदराबादच्या वारंगल जिल्ह्यातून आंब्याच्या ८० गाड्या कळमन्यात आल्या. ६० टक्के मालाची विक्री झाली आणि उर्वरित ४० टक्के मालाच्या विक्रीची मंगळवारी अपेक्षा होती. शिवाय मंगळवारी पुन्हा आंब्याच्या ७० गाड्या आल्या, पण अर्ध्यापेक्षा जास्त माल पडून आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने वा हातठेले सुरू ठेवल्यानंतर ते पुन्हा ५.३० वाजता विक्रीसाठी दुकाने उघडणार नाहीत. त्यामुळे मंगळवारी आंब्याची विक्री कमी झाल्याचे डोंगरे यांनी सांगितले. पुढे फळे विक्रीविना पडून राहण्याचे प्रमाण वाढणार असल्याचे डोंगरे यांनी स्पष्ट केले.
कळमन्यात कधी होणार अॅन्टिजन चाचणी
कळमन्यात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका भाजी बाजार व फळे बाजारात आहे, पण प्रशासकाने या बाजारांमध्ये अॅन्टिजन चाचणी मोहीम राबविण्याचा निर्णय अजूनही घेतलेला नाही. भाजी बाजारात अॅन्टिजन चाचणी घेतल्यास शेकडो जण पॉझिटिव्ह निघण्याची शक्यता आहे. हीच स्थिती फळ बाजारात आहे. हा बाजार सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवारी भरतो. लिलावादरम्यान शेकडो व्यापारी, शेतकरी व ग्राहक गर्दी करतात. याकडे लक्ष देण्यास प्रशासनातर्फे कुणीही अधिकारी उपस्थित राहत नाही, असा आरोप अडत्यांनी केला.
सेस तुम्हीच जमा करा!
कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कळमन्यातील प्रशासकीय कार्यालय बंद आहे. त्यामुळे माल खरेदी करून कळमन्याबाहेर नेण्यासाठी सेस जमा करण्यासाठी अडचण होत आहे. त्यामुळे अडत्यांनी सेस जमा करून कार्यालयात जमा करावा, असे अतिरिक्त काम आमच्यामागे लावल्याचे अडत्यांनी सांगितले. प्रशासकाला जशी कर्मचाऱ्यांची काळजी आहे, तशीच ग्राहक, व्यापारी, विक्रेते आणि अडत्यांची घ्यावी, अशी मागणी अडत्यांनी केली.