१५ जुलैनंतर लागू शकतो दहावीचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:09 AM2021-06-16T04:09:59+5:302021-06-16T04:09:59+5:30
नागपूर : कोरोना संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी, विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन करून बोर्ड निकाल जाहीर करणार ...
नागपूर : कोरोना संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी, विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन करून बोर्ड निकाल जाहीर करणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित केली असून, प्रत्येक शाळांना विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाइन भरावे लागणार आहेत. याशिवाय गुणांची हार्डकॉपी विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठविणे अनिवार्य आहे. ही सर्व प्रक्रिया ३ जुलैपर्यंत पूर्ण करायची आहे. त्यानंतर राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे १५ जुलैनंतरच दहावीचा निकाल लागू शकतो, असे संकेत मिळताहेत.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इयत्ता दहावीच्या परीक्षांचे मूल्यमापन निश्चित करण्यात आले आहे. ११ ते ३० जून या कालावधीत शाळांची जबाबदारी, विषयनिहाय शिक्षकांचे कर्तव्य, प्रत्यक्ष निकाल, निकाल समिती आणि मुख्याध्यापकांचे कर्तव्य आदी बाबी राज्य शिक्षण मंडळाने निश्चित केल्या आहे. नववी आणि दहावीच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण द्यावे लागणार आहे. निकषनिहाय गुण एकत्रित केल्यानंतर मुख्याध्यापकांना मंडळाने प्रसिद्ध केलेल्या लिंकद्वारे ते ऑनलाइन भरावे लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया ३ जुलैपर्यंत पूर्ण करायची आहे. याशिवाय एकत्रित शाळानिहाय दहावीच्या गुणांची यादी, विद्यार्थ्यांचे नाव, आसन क्रमांकाची हार्ड कॉपी बंद पाकिटात मुख्याध्यापकांना विभागीय बोर्डाकडे पाठवावी लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने विषयनिहाय गुण आणि निकालाबाबत शिक्षकांसाठी यू-ट्यूबवर मार्गदर्शन केले आहे.
- पुढील जबाबदारी राज्य मंडळाची
शाळांना ३० जूनपर्यंत गुणदानाची प्रक्रिया शाळांना पार पाडायची आहे. ३ जुलैपर्यंत बोर्डाच्या वेबसाइटवर एक्सल शीटमध्ये गुण भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, छपाई करणे आदी प्रक्रिया होणार आहे. साधारणत: १५ जुलैनंतरच दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
- नागपूर विभागीय मंडळातील दहावीचे विद्यार्थी
नागपूर - ६०,३८६
भंडारा - १६,५३९
चंद्रपूर - २८,९८९
वर्धा - १६,४२९
गडचिरोली - १४,४२९
गोंदिया - १९,३३५