‘एलएलबी’चा निकाल रखडला
By admin | Published: July 25, 2014 12:50 AM2014-07-25T00:50:04+5:302014-07-25T00:50:04+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एलएलबी तृतीय वर्ष सहाव्या सेमिस्टरचा निकाल रखडला आहे. बाहेरील विद्यापीठातील प्रवेश आणि इंडियन बार कौन्सिलच्या परीक्षेची मुदत संपण्यावर असूनही
नागपूर विद्यापीठ : तृतीय वर्षासाठी ‘स्कीम आॅफ मार्किंग’च नाही
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एलएलबी तृतीय वर्ष सहाव्या सेमिस्टरचा निकाल रखडला आहे. बाहेरील विद्यापीठातील प्रवेश आणि इंडियन बार कौन्सिलच्या परीक्षेची मुदत संपण्यावर असूनही निकाल लागण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विधी अभ्यासमंडळाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकार होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
मे महिन्यात एलएलबी तृतीय वर्षाच्या सहाव्या सेमिस्टरची परीक्षा संपली. परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल लागणे अपेक्षित होते. परंतु २ महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही परीक्षेचा निकाल लागला नाही. २०१२-१३ साली विधी विद्या शाखेने ‘सीबीएस’नुसार (क्रेडिट बेस्ड सिस्टीम) नवीन अभ्यासक्रम लागू केला. हा अभ्यासक्रम लागू करताना अभ्यासमंडळाने २०११-१२ साली एलएलबी प्रथम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सीबीएस’ अभ्यासक्रमात सामवून घेतले. या विद्यार्थ्यांनी यंदाच्या उन्हाळ्यात अंतिम सत्राची परीक्षा दिली. त्यामुळे त्यांचा अंतिम निकाल हा ‘सीबीएस’नुसार देणे आवश्यक आहे. परंतु अभ्यासमंडळाने २०११-१२ सालच्या विद्यार्थ्यांना ‘सीबीएस’ अभ्यासक्रमात सामावून घेताना त्यांच्या पहिल्या दोन सेमिस्टरचे ‘सीबीएस’नुसार ‘स्कीम आॅफ मार्किंग’ केले नाही. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांची भेटदेखील घेतली. लवकरात लवकर निकाल लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांच्याशी संपर्क केला असता ते बैठकीत व्यस्त असल्याने प्रतिक्रिया देऊ शकले नाही. (प्रतिनिधी)