SSC Result 2020; ३१ विषयांचा निकाल ९५ टक्क्यांहून अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:35 AM2020-07-30T11:35:52+5:302020-07-30T11:37:37+5:30
नागपूर विभागातील ८६ टक्के विषयांचा निकाल चक्क ९५ टक्क्यांहून अधिक लागला आहे तर ११ विषयांचा निकाल हा ‘सेंटपर्सेंट’ लागला आहे.
योगेश पांडे
नागपूर : यंदा दहावीच्या निकालामध्ये भरभरुन गुण मिळाले असून ‘किलर’ ठरणाऱ्या विषयातदेखील विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली झाली आहे. नागपूर विभागातील ८६ टक्के विषयांचा निकाल चक्क ९५ टक्क्यांहून अधिक लागला आहे तर ११ विषयांचा निकाल हा ‘सेंटपर्सेंट’ लागला आहे.
नागपूर विभागातील विद्यार्थ्यांनी एकूण ३६ विषयांची परीक्षा दिली. त्यातील ३१ विषयांचा निकाल ९५ टक्क्यांहून अधिक आला आहे. केवळ ५ विषयांचा निकाल ९३ टक्के ते ९५ टक्के या टक्केवारीत आहे. एरवी विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजी या विषयांचीच भीती वाटत असते. विभागात गणिताचा निकाल ९५.३१ टक्के इतका लागला आहे तर इंग्रजी (प्रथम भाषा) विषयाचा निकाल ९९.१४ टक्के तर इंग्रजी (द्वितीय भाषा) विषयाचा निकाल ९३.७८ टक्के लागला आहे. इंग्रजीबद्दलची विद्यार्थ्यांमधील भीती दिवसेंदिवस कमी होत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
मात्र मागील वर्षीप्रमाणेच इंग्रजीच्या तुलनेत मराठी भाषेचा निकाल कमी लागला आहे. मागील वर्षी मराठीचा (प्रथम भाषा) निकाल ८६.६८ टक्के तर मराठी (द्वितीय-तृतीय भाषा)चा निकाल ९३.०१ टक्के होता. यंदा हीच आकडेवारी अनुक्रमे ९४.२३ व ९६.४९ टक्के इतकी आहे. मराठीची टक्केवारी वाढली असली तरी इतर विषयांच्या तुलनेत ती कमी आहे. हिंदीचा (प्रथम भाषा) निकाल ९३ टक्के व हिंदी (द्वितीय भाषा) ९३.५५ टक्के इतका लागला आहे. सर्वात कमी निकाल हिंदीचाच आहे.
संस्कृतने यंदादेखील विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी मोलाचा हात दिला आहे. संस्कृतचा विभागातील निकाल ९९.८४ टक्के लागला आहे.
१० विषयात १०० हून कमी विद्यार्थी
विभागात सर्वात जास्त १ लाख ५७ हजार ९९३ विद्यार्थी विज्ञान विषयाच्या परीक्षेला बसले. त्याखालोखाल १ लाख ५७ हजार ७०० विद्यार्थ्यांनी गणित विषयाची परीक्षा दिली. १० विषयामध्ये १०० किंवा त्याहून कमी परीक्षार्थी होते. हिंदी-तामिळ विषयाला ( द्वितीय भाषा) तीनच विद्यार्थी होते.
विज्ञानाने तारले
विज्ञान व तंत्रज्ञान विषयात ९६.३२ टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. मागील वर्षी हेच प्रमाण ९३.४० टक्के इतके होते. सामाजिक विज्ञान विषयात ९९.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.