डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचा निकाल जाहीर : ९९ शॉर्ट फिल्मचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:06 PM2020-05-29T22:06:22+5:302020-05-29T22:08:03+5:30
कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा आणि प्रभावी जनजागरण करता यावे, या संकल्पनेतून शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलला फिल्ममेकर्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेत एकूण ९९ शॉर्ट फिल्म आल्या. त्यातून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सहा जणांच्या शॉर्ट फिल्म्सना पुरस्कार घोषित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा आणि प्रभावी जनजागरण करता यावे, या संकल्पनेतून शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलला फिल्ममेकर्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेत एकूण ९९ शॉर्ट फिल्म आल्या. त्यातून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सहा जणांच्या शॉर्ट फिल्म्सना पुरस्कार घोषित करण्यात आले आहे.
अनेक गोष्टी वारंवार सांगूनही त्या लक्षात राहत नाहीत. याउलट एखादी चित्र अथवा व्हिडिओ बघून नागरिकांच्या मनावर त्याचा लवकर आणि प्रभावी परिणाम होतो. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्स किती महत्त्वपूर्ण आहे, ते पटवून देण्यासाठी या फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी संबंधित कलावंत सोशल डिस्टन्स या विषयावर एक ते दोन मिनिटाची व्हिडीओ क्लिप बनवून ती १६ ते २२ मे पर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. एकूण ९९ जणांनी आपल्या शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी पाठविल्या. त्यातील ८८ फिल्म्स स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आल्या.
या स्पर्धेच्या परीक्षणसाठी अभिनेता रवींद्र दुरुगकर आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विदर्भ समन्वयक मिलिंद रमेश कुळकर्णी यांची मोलाची मदत मिळाल्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले आहे.
यांना मिळणार पुरस्कार
श्रुती ढोके आणि फैज खान यांना स्पर्धेतील सर्वोत्तम अनुक्रमे पहिला तसेच दुसरा (२१ हजार आणि १५ हजार) तर ११ हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार अजय राजकारणे तसेच करण पंढरीनाथ पेनोरे यांना विभागून देण्यात येणार आहे. एनिमिशन गटात अविनाश दिनेश निकाश यांना तर अन्य १९ जणांना प्रोत्साहन पुरस्कार मिळणार आहेत.