रिटेल मोबाइल विक्रेत्यांचा धंदा बसला; ई-कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:07 AM2021-05-27T04:07:36+5:302021-05-27T04:07:36+5:30
नागपूर : लॉकडाऊनमध्ये दीड महिन्यांपासून रिटेल मोबाइल विक्रेत्यांची दुकाने बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. याउलट देशविदेशातील ई-कॉमर्स ...
नागपूर : लॉकडाऊनमध्ये दीड महिन्यांपासून रिटेल मोबाइल विक्रेत्यांची दुकाने बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. याउलट देशविदेशातील ई-कॉमर्स कंपन्या शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून मोबाइलची ऑनलाइन विक्री करीत आहेत. त्यामुळे नागपुरात कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प झाला आहे. ऑनलाइन मोबाइल विक्रीसाठी ई-कॉमर्स कंपन्यांवर प्रतिबंध लावण्याची रिटेल मोबाइल विक्रेत्यांची शासनाकडे मागणी आहे.
नागपुरात मोबाइल आणि अॅक्सेसरीज विक्रीची लहान-मोठी जवळपास ५०० दुकाने आहेत. या सर्व दुकानातून महिन्याला कोट्यवधींचा व्यवसाय होतो; पण दुकाने बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. या शिवाय वितरकाचे जाळेही खंडित झाले आहे. दुसरीकडे ई-कॉमर्स कंपन्यांवर जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य वस्तूंच्या विक्रीवर प्रतिबंध आहे. त्यानंतरही या कंपन्या ग्राहकांना ऑनलाइन मोबाइलची विक्री करीत आहेत. त्याचा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसतो आहे. दुकाने सुरू झाल्यानंतर रिटेल मोबाइल विक्रीवर परिणाम होणार आहे. लॉकडाऊननंतरही दुकाने सुरळीत होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे मत सीताबर्डी येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानदार संघाचे पदाधिकारी सुरेंद्र दावडा यांनी सांगितले.
या संदर्भात ऑल इंडिया मोबाइल रिटेल असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन याप्रकरणी त्यांचे लक्ष वेधले. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष कैलास लखनानी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाइन चर्चा केली आहे. पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना राज्य शासनाने आवश्यक वस्तूंच्याच विक्रीची परवानगी दिली आहे. या कंपन्या मात्र मोबाइल, अॅक्सेसरीज आणि अन्य अनावश्यक वस्तूंचीही विक्री करीत आहेत. त्यामुळे रिटेल मोबाइल विक्रेत्यांवर परिणाम झाला आहे. सरकारने यासंदर्भात कठोर कारवाई करावी. ही बाब मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला त्वरित सूचना करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नागपुरात ४०० कोटींचा व्यवसाय बुडाला!
दीड महिन्यापासून रिटेल मोबाइल विक्रेत्यांची दुकाने बंद असल्याने मोबाइल आणि अॅक्सेसरीज विक्रीचा जवळपास ४०० कोटींचा व्यवसाय बुडाल्याची माहिती आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही, असे विक्रेते आणि वितरकांनी सांगितले. नागपुरात सर्व कंपन्यांचे वितरक असून त्यांच्या माध्यमातून विक्रेत्यांना मोबाइलचा पुरवठा करण्यात येतो. पण, लॉकडाऊनमुळे वितरण थांबले आहे. दरम्यान, ई-कॉमर्स कंपन्या ऑनलाइन विक्री करीत असल्याने विक्रेत्यांवर संकट आले आहे.