रेतीघाट बंद, साठा मात्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:48+5:302021-07-20T04:07:48+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : कन्हान नदीवरील रेतीघाट बंद असतानाही रेतीचा अवैध उपसा आणि साठा करणे सुरूच आहे. ही ...

Retighat closed, stocks continue | रेतीघाट बंद, साठा मात्र सुरूच

रेतीघाट बंद, साठा मात्र सुरूच

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : कन्हान नदीवरील रेतीघाट बंद असतानाही रेतीचा अवैध उपसा आणि साठा करणे सुरूच आहे. ही बाब महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सावनेर तालुक्यातील दहेगाव (रंगारी), चनकापूर व रनाळा (ता. कामठी) परिसरात साेमवारी (दि. १९) दुपारी टाकलेल्या धाडीवरून स्पष्ट झाली. या धाडीत अधिकाऱ्यांनी तब्बल ७१० ब्रास रेतीचा साठा जप्त केला. या रेतीची किंमत बाजारभावाप्रमाणे २८ लाख ४० हजार रुपये आहे.

दहेगाव (रंगारी), चनकापूर व रनाळा परिसरात माेठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवल्याची माहिती तहसीलदार सतीश मसाळ यांना देण्यात आली हाेती. त्या अनुषंगाने महसूल विभागाच्या पथकाने या दहेगाव (रंगारी) परिसरातील दाेन, रनाळा परिसरातील तीन तर चनकापूर येथील तीन ठिकाणांची पाहणी केली. यात त्यांना आठही ठिकाणी रेतीचा माेठा साठा आढळून आला. या रेतीवर मालकी हक्क सांगणारा कुणीही पुढे न आल्याने कर्मचाऱ्यांनी हा साठा जप्त केला.

या कारवाईत दहेगाव (रंगारी) येथील आशियाना हाॅटेलच्या मागच्या भागातून १२० ब्रास, रामलक्ष्मी सभागृहाजवळ ५० ब्रास, रनाळा येथील सर्व्हे क्रमांक १९८ व १९९ मधून १३० ब्रास, सर्व्हे क्रमांक १४८/२ व १५० मधून २१५ ब्रास, काेठाडे आयटीआयजवळून ७० ब्रास, चनकापूर येथील खान ले आऊटमधून ४५ ब्रास, पाणी फिल्टर प्लांटजवळून ४० ब्रास व वाॅर्ड क्रमांक-१ मधून ४० ब्रास असा एकूण ७१० ब्रास रेतीसाठा जप्त केला.

उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी या संपूर्ण साठ्याची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या रेतीची राॅयल्टी कुणीही महसूल विभागाकडे सादर केली नव्हती. जप्त केलेला रेतीचा साठा खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या आवारात स्थानांतरित केला जाणार असल्याची माहिती अतुल म्हेत्रे यांनी दिली. ही कारवाई तहसीलदार सतीश मसाळ यांच्या नेतृत्वात संदीप नखाते, मनोज रामटेके, नितेश मोहीतकर, गणेश मोरे, राजेश बारापात्रे या कर्मचाऱ्यांनी केली.

...

७३.८४ लाख रुपये किमत नव्हे दंड

महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी या रेतीची किंमत ७३ लाख ८४ रुपये असल्याचे सांगितले. ही किंमत १० हजार ४०० रुपये प्रति ब्रासप्रमाणे आकारण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वास्तवात, रेतीचा बाजारभाव ३,५०० ते ४,००० रुपये प्रति ब्रास आहे. शासकीय राॅयल्टीची किंमत यापेक्षा कमी आहे. जप्त केलेल्या रेतीसंदर्भात प्रति ब्रास १० हजार ४०० ते २४ हजार रुपयांचा दंड आकारण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. त्यामुळे ७३ लाख ८४ हजार रुपये ही रेतीची किंमत नसून, दंडाची रक्कम आहे. हा दंड संबंधित व्यक्तींकडून वसूल केला जाणार आहे.

...

जागा मालकांना नाेटीस

ही रेती ज्या जागेवर साठवून ठेवली हाेती, त्या जागेच्या मालकांना महसूल विभागाने नाेटीस बजावली आहे. जागा मालकांनी रेती मालकांची नावे जर सांगितली नाहीत, तर दंडाची रक्कम जागा मालकांकडून वसूल केली जाईल. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी रेतीमालकांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. कारवाईदरम्यान काही रेती तस्कर तहसीलदारांच्या वाहनामागे फिरत हाेते. दहेगाव (रंगारी), चनकापूर व पोटा परिसरात आणखी रेतीसाठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Retighat closed, stocks continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.