‘टायर्ड’ विद्यापीठाला ‘रिटायर्ड’चा आधार
By admin | Published: May 17, 2015 03:01 AM2015-05-17T03:01:00+5:302015-05-17T03:01:00+5:30
वाढलेला कामाचा ताण अन् कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे चक्क सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा घेण्याची वेळ
नागपूर : वाढलेला कामाचा ताण अन् कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे चक्क सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा घेण्याची वेळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर आलेली आहे. परंतु तंत्रज्ञानाचे ज्ञान तर सोडाच परंतु साधी ‘नोटशीट’देखील नीट लिहू न शकणाऱ्या काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचादेखील यात समावेश आहे. विद्यापीठाला ‘टेक्नोसॅव्ही’ करण्याचा कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचा संकल्प आहे. परंतु अशा स्थितीत नव्या योजनांची अंमजबजावणी करून खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर विद्यापीठ कधी जाणार व ‘टेक्नोसॅव्ही’ रुप कसे येणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
नागपूर विद्यापीठात अद्याप शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदभरती न झाल्याने विविध विभागांवर प्रचंड ताण आलेला आहे. यामुळे परीक्षा विभागाच्या कामावर सर्वात जास्त परिणाम होत आहे. पदभरती करण्याचे सोडून विद्यापीठाने यावर वेगळाच मार्ग शोधून काढला आहे.
सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यास विद्यापीठाने सुरुवात केली आहे. यातील सुमारे १० अधिकारी तर एप्रिल महिन्यातच रुजूदेखील झाले. शिवाय या आठवड्यातदेखील विद्यापीठाने २ ते ३ सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना रुजू होण्यासंदर्भात पत्र दिले आहे.
हे कर्मचारी व अधिकारी सुमारे दीड लाख पदवी प्रमाणपत्रांचे वाटप तसेच प्राधिकरणांच्या निवडणुकांच्या कामात सहभागी होणार आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानाचा गंधदेखील नाही. कुलगुरूंच्या ‘व्हीजन’मध्ये कुठेही हे लोक ‘फिट’ बसत नाहीत. परंतु तरीदेखील प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी नाईलाजाने त्यांची सेवा विद्यापीठाला घ्यावी लागत आहे. (प्रतिनिधी)