सेवानिवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे नागपूरचा अभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:09+5:302021-04-24T04:08:09+5:30
नागपूर : नागपूरचे सुपुत्र असलेले विधिज्ञ शरद अरविंद बोबडे हे देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. त्यांनी ...
नागपूर : नागपूरचे सुपुत्र असलेले विधिज्ञ शरद अरविंद बोबडे हे देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. त्यांनी या पदावर तब्बल १ वर्ष ५ महिने ६ दिवस उल्लेखनीय कार्य केले. एवढेच नाही तर, त्यांची विधी क्षेत्रातील एकूणच कारकीर्द गौरवास्पद राहिली आहे. ते गेल्या ४३ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रातील सर्वोच्च पदापर्यंत पोहचून संपूर्ण देशात नागपूरचा मान वाढवला. नागपुरातील विधिज्ञांनी त्यांच्याविषयी 'लोकमत'शी बोलताना ते नागपूरचा अभिमान असल्याची भावना एकसुरात व्यक्त केली.
----------------
प्रशंसनीय कार्य केले
सेवानिवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे निष्णांत कायदेपंडित असून त्यांनी सरन्यायाधीश म्हणून अतिशय प्रशंसनीय कार्य केले. त्यांनी कोरोना काळामध्ये न्यायव्यवस्था कोलमडू दिली नाही. न्यायाचा झरा सतत वाहता ठेवला. याकरिता त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडके आहे. त्यांनी प्रत्येक जबाबदारीला न्याय दिला हे विशेष.
--- ॲड. पुरुषोत्तम पाटील, उपाध्यक्ष, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर.
----------------
कोरोना काळातही न्यायदान कायम
सेवानिवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी कोरोना काळामध्ये उत्कृष्ट पद्धतीने परिस्थिती हाताळली. त्यांनी न्यायदानाचे कार्य थांबू दिले नाही. सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन कामकाज करून पीडितांना योग्यवेळी न्याय दिला. ही त्यांची मोठी उपलब्धी आहे. देशातील सर्व विधिज्ञांना त्यांच्यावर अभिमान आहे.
----- ॲड. कमल सतुजा, अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन.
----------------
अविस्मरणीय कारकीर्द
नागपूरचे सुपुत्र शरद बोबडे यांची केवळ सरन्यायाधीशपदाची नाही तर, आतापर्यंतची एकूणच कारकीर्द अविस्मरणीय आहे. विधिज्ञ म्हणून त्यांनी अतिशय अभिमानास्पद कार्य केले आहे. त्यांनी सरन्यायाधीशपदी कार्यरत असताना अयोध्यासह अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये निर्णय दिले. ते निष्णात विधिज्ञ आहेत.
----- ॲड. शशिभूषण वहाणे, ज्येष्ठ विधिज्ञ.
-------------
कनिष्ठ वकिलांसाठी आदर्श
सेवानिवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांची कारकीर्द कनिष्ठ वकिलांसाठी आदर्श आहे. त्यांनी निरोप समारंभात बोलताना, ते कनिष्ठ वकिलांना सतत मार्गदर्शन करीत राहतील अशी ग्वाही दिली. त्यामुळे कनिष्ठ वकिलांना प्रोत्साहन मिळाले. त्यांनी सुरुवातीला वकील आणि त्यानंतर उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून गौरवास्पद कार्य केले आहे.
----- ॲड. राजेंद्र डागा, प्रसिद्ध फौजदारी वकील.