निवृत्त अभियंत्याचा नागपुरातील हॉटेलमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 09:11 PM2019-06-17T21:11:18+5:302019-06-17T21:15:29+5:30
कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या एका निवृत्त अभियंत्याचा धंतोलीच्या एका हॉटेलमध्ये आकस्मिक मृत्यू झाला. प्रदीप अशोकराव गाडगे (वय ५५) असे मृताचे नाव आहे. गाडगे प्रतापनगरातील दीनदयालनगरमधील रहिवासी होते. सार्वजनिक बांधकाम विभागात ते सिव्हिल इंजिनिअर होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या एका निवृत्त अभियंत्याचा धंतोलीच्या एका हॉटेलमध्ये आकस्मिक मृत्यू झाला. प्रदीप अशोकराव गाडगे (वय ५५) असे मृताचे नाव आहे.
गाडगे प्रतापनगरातील दीनदयालनगरमधील रहिवासी होते. सार्वजनिक बांधकाम विभागात ते सिव्हिल इंजिनिअर होते. सधन कुटुंबातील गाडगे यांचे एक बंधू डॉक्टर आहेत. कौटुंबिक वादातून प्रदीप गाडगे १० वर्षांपूर्वी पत्नीपासून दुरावले. त्यांनी नोकरीतूनही स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते कुटुंबातील सदस्यांपासून दूर राहू लागले. गेल्या काही दिवसांपासून ते धंतोलीतील जगन्नाथ हॉटेलमध्ये अधून मधून मुक्कामी थांबत होते रविवारी ते हॉटेलच्या रूम नंबर १०१ मध्ये मुक्कामी होते. रात्री ७.१५ वाजता त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना धंतोलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तेथे मृत घोषित केले. त्यांचे नातेवाईक रमेश दामोदर गाडगे (वय ५१, रा. हंसापुरी, छोटी खदान) यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोलीचे पोलीस उपनिरीक्षक वानखेडे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.