निवृत्त शासकीय अधिकाऱ्याने केला एकाकी जीवनाचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:28 AM2019-04-10T00:28:03+5:302019-04-10T00:30:44+5:30
एकाकी जीवन जगणाऱ्या एका ८२ वर्षीय वृद्धाने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केली. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगरात उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाकी जीवन जगणाऱ्या एका ८२ वर्षीय वृद्धाने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केली. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगरात उघडकीस आली. श्रीधर गोपाळराव मुटाटकर (वय ८२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते शिवाजीनगरातील नीलकमल भवनमध्ये राहत होते.
मुटाटकर निवृत्त शासकीय अधिकारी होते. ते एकटेच तेथे राहत होते. वृद्धत्वामुळे त्यांना आजारांनी ग्रासले होते. तशात देखभाल करण्यासाठी आप्तस्वकीय नसल्याने ते त्रस्त झाले होते. अखेर त्यांनी स्वत:च्या गळ्यावर आणि हातावर ब्लेडने वार करून आत्महत्या केली. ते रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे पाहून त्यांची कुणी हत्या केली असावी,अशी शंका आल्याने शेजाऱ्यांनी अंबाझरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुटाटकर यांना गंभीर अवस्थेत डॉ. दंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी मुटाटकर यांना मृत घोषित केले.
मृत्यूपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली. पोलिसांनी ती जप्त केली. आजार आणि एकाकी जीवनाला वैतागून आत्महत्या करीत असल्याचे या सुसाईड नोटमध्ये लिहून असल्याचे यातून स्पष्ट झाले. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.