दुर्मिळ नाणी विकत घेण्याच्या नावाखाली रिटायर्ड मुख्याध्यापिकेची ४० लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 10:42 PM2023-05-18T22:42:16+5:302023-05-18T22:42:53+5:30
Nagpur News दुर्मिळ नाणी विकत घेण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची ४० लाखांनी फसवणूक केली.
योगेश पांडे
नागपूर : दुर्मिळ नाणी विकत घेण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची ४० लाखांनी फसवणूक केली. आश्चर्याची बाब म्हणजे तिच्यावर दबाव आणण्यासाठी आरोपींनी कस्टम व पोलीस कारवाईचीदेखील भिती दाखविली. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रभागा खोब्रागडे (६२, पूजा रेसिडन्सी, मानकापूर) असे संबंधित मुख्याध्यापिकेचे नाव आहे. १४ एप्रिल रोजी त्या एका खाऊगल्लीत बसल्या असताना एका महिलेने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. जर तुमच्याकडे वैष्णोदेवीची जुनी नाणी असतील तर तुम्हाला खूप पैसे मिळू शकतील. युट्यूब चॅनलवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा, असे तिने त्यांना सांगितले.
खोब्रागडे यांच्याकडे तशी काही दुर्मिळ नाणी होती. त्यांनी संबंधित चॅनलवर दिलेल्या क्रमांकावर फोन करून विचारणा केली. समोरील व्यक्तीने नाण्यांचे फोटो पाहून त्याचे २८ लाख रुपये मिळतील असे सांगितले. मात्र त्यासाठी त्याने अगोदर टॅक्स व जीएसटी व्हेरिफिकेशनसाठी ३८ हजार रुपये पाठवायला लावले. त्यानंतर २८ लाख रुपये रोख घेऊन माणून निघाला असून त्याच्या सुरक्षा चार्जच्या नावाने ५० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. काही वेळाने त्यांना फोन आला व अनुराग ठाकूर नाव सांगत समोरील व्यक्तीने त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्याने सुमारे दीड लाख रुपये एका खात्यावर पाठविण्यास सांगितले. मात्र ते पैसे मिळाले नाही असे म्हणत त्याने २ मे पर्यंत त्यांच्याकडून आणखी लाखो रुपये उकळले.
त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेकडून तुमच्या नावाचा वॉरंट निघाल्याची भिती दाखविण्यात आली व तसा बोगस वॉरंट त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठविण्यातदेखील आला. परत भिती दाखवत त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपये उकळण्यात आले. राणा प्रतापसिंग व यशस्वी यादव अशी नावे सांगत दोन जण त्यांना धमक्या देत होते. तुम्हाला २८ लाखांऐवजी ७० लाख रुपये परतावा मिळेल असे त्यांनी सांगितले. १४ मे रोजी प्रवीण नावाचा व्यक्ती नागपूर विमानतळावर पैसे घेऊन आला असून त्याला आयकर खात्याच्या पथकाने पकडले असून सेटलमेंटसाठी पाच लाख रुपये लागतील असे सांगण्यात आले. खोब्रागडे यांनी संबंधित आयकर अधिकाऱ्याचे नाव विचारले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. आपली फसवणूक झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. आरोपींनी त्यांच्याकडून सुमारे ४० लाख रुपये उकळले. त्यांनी सायबर सेलला तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.