सेवानिवृत्त न्यायमूर्ती वासुदेव सांबरे यांचे निधन

By admin | Published: July 8, 2016 02:50 AM2016-07-08T02:50:53+5:302016-07-08T02:50:53+5:30

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती वासुदेव महादेवराव सांबरे यांचे गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

Retired Justice Vasudev Sambar passes away | सेवानिवृत्त न्यायमूर्ती वासुदेव सांबरे यांचे निधन

सेवानिवृत्त न्यायमूर्ती वासुदेव सांबरे यांचे निधन

Next

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती वासुदेव महादेवराव सांबरे यांचे गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
वासुदेव सांबरे त्यांचे ज्येष्ठ पुत्र व मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्याकडे राहात होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होता. त्यांचे पार्थिव औरंगाबादवरून नागपुरात आणण्यात आले. धंतोली येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. दरम्यान, न्यायमूर्ती, वकील, अधिकारी आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले न्यायमूर्ती नितीन सांबरे व अ‍ॅड. सचिन सांबरे, दोन मुली चारू व रागिणी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
२४ जून १९३२ रोजी अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबात वासुदेव सांबरे यांचा जन्म झाला. न्यायालय प्रबंधक कार्यालयात नोकरी करीत असतानाच त्यांनी १९६८ मध्ये एल.एल.बी. पदवी पूर्ण केली. यानंतर पुढील दीड दशक त्यांनी मुंबई उच्च न्यायालयासह अन्य विविध न्यायालयांत वकिली करून दिवाणी, फौजदारी, संविधानिक, कामगार, महसूल इत्यादी प्रकारची प्रकरणे हाताळली. तसेच, ते शासनाच्या विविध विभागाचे वकील होते. आॅक्टोबर-१९८१ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मुख्य सरकारी वकीलपदी नियुक्ती करण्यात आली. ते १९७७ पासून महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य होते. दरम्यान त्यांनी एप्रिल-१९८४ ते सप्टेंबर-१९८४ पर्यंत कौन्सिलचे अध्यक्षपद सांभाळले. याशिवाय त्यांनी नागपूर विद्यापीठासाठी व्याख्याता व परीक्षक म्हणूनही कार्य केले होते. २१ नोव्हेंबर १९८६ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. परिविक्षा काळ संपल्यानंतर १५ जून १९८७ रोजी त्यांना न्यायमूर्तिपदी कायम करण्यात आले. त्यांनी न्यायमूर्ती म्हणून मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे कार्य केले. त्यावेळी त्यांचे अनेक निर्णय गाजले. १९९४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते.
वकिली करताना व न्यायमूर्ती असतानाही त्यांनी एक सभ्य व्यक्ती अशी स्वत:ची ख्याती कायम ठेवली. त्यावेळी ज्युनिअर असणाऱ्या व आता प्रस्थापित झालेल्या अनेक वकिलांना त्यांचे मार्गदर्शन मिळाले. ज्युनिअर वकिलांना ते नेहमीच प्रोत्साहन देत होते. त्यांच्या निधनामुळे विधी क्षेत्रात शोककळा पसरली.(प्रतिनिधी)

Web Title: Retired Justice Vasudev Sambar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.