वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय झाले ६२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:27+5:302021-06-01T04:07:27+5:30
नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील रिक्त पदे व रुग्णसेवेवर त्याचा होणारा परिणाम आणि कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने ...
नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील रिक्त पदे व रुग्णसेवेवर त्याचा होणारा परिणाम आणि कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने ३१ मे २०२१ रोजी सेवानिविृत्त होणाऱ्या राज्यातील १९३ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय एक वर्षासाठी वाढवून आता ६२ केले आहे. नागपूर जिल्ह्यात या निर्णयाचा जवळपास १६ अधिकाऱ्यांना फायदा झाला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर हे सोमवारी सेवानिवृत्त होणार होते. परंतु, त्यांनाही याचा पुढील पाच महिन्यांसाठी लाभ मिळाला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राज्य कामगार विमा योजनेंतर्गत रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय २०१८ मध्ये ५८ वरून ६० वर्षे करण्यात आले होते. आता हाच निर्णय ३१ मे २०२२ पर्यंत लागू करण्यात आला आहे. या मागे वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमतरता, यामुळे रुग्णांना वेळेत आरोग्य सुविधा पुरविण्यात निर्माण होत असलेल्या अडचणी, वैद्यकीय अधिकारी तसेच विशेषज्ञ पदासाठी प्रयत्न करूनदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसलेले वैद्यकीय अधिकारी व उपलब्ध झाल्यास पसंतीच्या ठिकाणी पदस्थापना न मिळाल्यास सेवेत रुजू न होण्याचे वाढलेले प्रमाण व कोरोनाचा संसर्ग व कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येत असल्याची कारणे दिली जात आहेत. परंतु, नागपूर जिल्ह्यात ज्या अधिकाऱ्यांना याचा फायदा होत आहे. त्यांचा थेट रुग्णसेवेशी संबंध नाही. त्यांच्या कार्यालयीन व्यवस्थापनेशी संबंध आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात आल्याने पात्र असताना पदोन्नतीपासून दूर असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांचा एक मोठा गट नाराज झाल्याचे चित्र आहे.