ग्राहकाचे ३८ हजार रुपये सहा टक्के व्याजासह परत करा, ग्राहक आयोगाचा नक्षत्र बॅन्क्वेटला आदेश
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: April 18, 2023 02:17 PM2023-04-18T14:17:42+5:302023-04-18T14:19:13+5:30
शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रार खर्चापोटी पाच हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश
नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३८ हजार रुपये सहा टक्के व्याजासह परत करा. तसेच, त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रार खर्चापोटी पाच हजार रुपये भरपाई द्या, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने गांधीसागर भागातील नक्षत्र बॅन्क्वेट सभागृहाचे संचालकांना दिले.
उमाजी नंदनवार, असे ग्राहकाचे नाव असून ते श्रीकृष्णनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी २०२० मध्ये मुलीच्या लग्नाकरिता नक्षत्र बॅन्क्वेट सभागृहाचे पाच लाख रुपयात बुकिंग केले होते. त्यापैकी १ लाख १८ हजार रुपये त्यांनी सभागृह संचालकांना अदा केले होते. दरम्यान, कोरोना संक्रमणामुळे लग्न रद्द करावे लागले. त्यानंतर सभागृह संचालकांनी त्यांना वेळोवेळी एकूण ८० हजार रुपये परत केले, पण उर्वरित ३८ हजार रुपये परत दिले नाही. परिणामी, त्यांनी सभागृह संचालकांना कायदेशीर नोटीस बजावली.
संचालकांनी त्या नोटीसची दखल घेतली नाही. करिता, नंदनवार यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष अतुल आळसी, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यांनी रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता हा निर्णय दिला.