गुंतवणुकीचे पैसे परत करा
By admin | Published: July 31, 2014 01:06 AM2014-07-31T01:06:39+5:302014-07-31T01:06:39+5:30
ठगबाज समीर जोशी आणि प्रशांत वासनकर याच्या कंपनीने फसवणूक केलेल्या १०० पेक्षा जास्त पीडित गुंतवणूकदारांनी न्याय्य मागण्यांसाठी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तासभर निदर्शने केली.
समितीची पोलीस आयुक्त मुख्यालयासमोर निदर्शने
नागपूर : ठगबाज समीर जोशी आणि प्रशांत वासनकर याच्या कंपनीने फसवणूक केलेल्या १०० पेक्षा जास्त पीडित गुंतवणूकदारांनी न्याय्य मागण्यांसाठी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तासभर निदर्शने केली. पीडितांच्या नारेबाजीने परिसर दणाणून गेला.
विविध कंपन्यांमध्ये फसलेल्या लोकांनी पीडित निवेशक संघर्ष समिती स्थापन केली आहे. पैसे परतीसाठी त्यांचा लढा सुरू आहे. समितीचे संयोजक जम्मू आनंद यांनी सांगितले, नागपूर शहर हे ठगबाज आणि गैरबँकिंग वित्तीस संस्थांची राजधानी झाले आहे. अनेक फसव्या कंपन्यांचे जाळे शहरात आहे. हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये या कंपन्यांमध्ये फसले आहे. सर्व स्तरातील लोकांना या कंपन्यांचा फटका बसला आहे. तक्रार केल्यानंतर तब्बल दोन महिने पोलीस आणि शासकीय यंत्रणा कारवाई करीत नसल्याने ठगबाजांचे फावते. यावेळी प्रमोद अग्रवाल, हरिभाऊ मंचलवार, श्रीसूर्या, वासनकर, प्रवीणे झामरे, जे.एम. फायनान्स, रविराज फायनान्स या ठगबाजांचा उल्लेख करण्यात आला. यांच्यावर वेळीच कारवाई झाली असती तर हजारो लोक फसले नसते. पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी पीडित निवेशक संघर्ष समितीची मागणी असल्याचे जम्मू आनंद यांनी सांगितले.
अन्य आरोपींना लवकरच अटक होणार
आर्थिक घोटाळ्यात लिप्त संचालक आणि एजंटांना लवकरच अटक करणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त सक्सेना यांनी चर्चेसाठी गेलेल्या समितीच्या सदस्यांना दिली.
कारवाईसाठी वेळ लागला हे सत्य असले तरीही सर्व बाजू तपासून कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात काही उणिवा राहू नयेत, यासाठी पोलीस दक्ष असल्याचे सक्सेना यांनी सांगितले.
आरोपींना व्हीआयपी सुविधांचा आरोप
अंबाझरी पोलीस कोठडीत प्रशांत वासनकर, विनय वासनकर आणि अभिजित चौधरी या तिघांना व्हीआयपी सुविधा देण्यात येत असल्याचा आरोप पीडितांनी केला. काहींनी अनुभवही कथन केले.