आमचे शिक्षक परत द्या : शिक्षणाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 12:55 AM2020-09-01T00:55:25+5:302020-09-01T00:56:32+5:30
कोरोना साथरोग उपाययोजनांतर्गत कामामध्ये नियुक्त शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे अशा शासनाकडून सूचना असताना, नागपूर जिल्ह्यात अजूनपर्यंत शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. शासनाच्या सूचनेनुसार ज्यांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे त्यांना कार्यमुक्त करावे, असे पत्र शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना साथरोग उपाययोजनांतर्गत कामामध्ये नियुक्त शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे अशा शासनाकडून सूचना असताना, नागपूर जिल्ह्यात अजूनपर्यंत शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. शासनाच्या सूचनेनुसार ज्यांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे त्यांना कार्यमुक्त करावे, असे पत्र शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून २४ जून रोजी एक परिपत्रक निर्गमित करून शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जे शिक्षक कोरोनाच्या कामात नियुक्त आहेत,त्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाला विनंती करण्यात यावी, असे म्हटले होते. दरम्यान, १७ आॅगस्ट रोजी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत पुन्हा एकदा परिपत्रक निर्गमित करून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. परंतु त्याचीसुद्धा कोणतीही दखल जि.प. अथवा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. चालू शैक्षणिक सत्रात प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नाहीत, परंतु विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे सुरू आहे. तसेच शाळेबाहेरची शाळा हा उपक्रमसुद्धा शाळेत राबविल्या जात आहे. शिवाय शिक्षण सभापती यांच्या सूचनेनुसार किमान एका शिक्षकाने दररोज शाळेत उपस्थित राहण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार शिक्षकांना दररोज शाळेत उपस्थित राहावे लागत आहे. त्यामुळे एकाच वेळी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहायचे की कोरोनाच्या संबंधाने झालेल्या नियुक्तीच्या कामावर उपस्थित राहायचे, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.
शिक्षणाधिकारी प्रा. चिंतामण वंजारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात विनंती करीत म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना शाळा बंद असल्याने ते राहत असलेल्या ठिकाणाजवळच्या शाळेत बोलावून ऑनलाईन प्रक्रियेत सहभागी करायचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या कामातून त्यांना कार्यमुक्त करावे.