२.३५ लाख रुपये १२ टक्के व्याजासह परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:11 AM2021-03-13T04:11:54+5:302021-03-13T04:11:54+5:30
नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाला त्याचे २ लाख ३५ हजार रुपये १२ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश जिल्हा ग्राहक ...
नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाला त्याचे २ लाख ३५ हजार रुपये १२ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ग्रेसलॅण्ड रियालिटीज कंपनीला दिला आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे. ही रक्कमही ग्रेसलॅण्डनेच द्यायची आहे.
मथुरादास राऊत असे ग्राहकाचे नाव असून, ते सहकारनगर येथील रहिवासी आहेत. त्यांची तक्रार आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी निकाली काढली. तक्रारीतील माहितीनुसार, राऊत यांनी ग्रेसलॅण्ड कंपनीच्या ले-आऊटमधील एक भूखंड खरेदी करण्यासाठी करार केला होता. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी कंपनीला एकूण ६ लाख ३५ हजार रुपये अदा केले होते. कंपनीने त्यांना दोन-तीन महिन्यात विक्रीपत्र करून देण्याची ग्वाही दिली होती. परंतु, त्यानुसार विक्रीपत्र करण्यात आले नाही. त्यामुळे राऊत यांनी रक्कम परत मागितली असता, कंपनीने त्यांना ऑक्टोबर-२०१४ मध्ये ४ लाख रुपये परत केले. परंतु, उर्वरित २ लाख ३५ हजार रुपये देण्यात आले नाही. परिणामी, राऊत यांनी आयोगात तक्रार दाखल केली होती. आयोगाने वरील आदेशाशिवाय राऊत यांना, ६ लाख ३५ हजार रुपयावर ८ मार्च २००८ ते १३ ऑक्टोबर २०१४ पर्यंत १० टक्के व्याज अदा करावे, असे निर्देश कंपनीला दिले आहेत. तसेच, या निर्देशाचे एक महिन्यात पालन करण्यात अपयश आल्यास या रकमेवर १२ टक्के व्याज लागू होईल, अशी तंबी कंपनीला देण्यात आली आहे. २ लाख ३५ हजार रुपयावर १४ ऑक्टोबर २०१४ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे.
--------------
कंपनीविरुद्ध एकतर्फी कारवाई
आयोगाने कंपनीला नोटीस पाठविली होती. त्यानंतर कंपनीने आयोगासमक्ष हजर होऊन लेखी उत्तर सादर केले नाही. त्यामुळे राऊत यांच्या तक्रारीवर एकतर्फी कारवाई करून रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारावर हा निर्णय देण्यात आला. कंपनीने राऊत यांना त्रुटीपूर्ण सेवा दिली. तसेच, त्यांच्यासाेबत अनुचित व्यापार पद्धतीचा उपयोग केला, असे निरीक्षण आयोगाने निर्णयात नोंदविले.