लसीकरणाविना वृद्ध नागरिकांना पाठविले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:08 AM2021-03-22T04:08:40+5:302021-03-22T04:08:40+5:30
- मोबाईलवर मात्र लसीकरण झाल्याचे प्राप्त झाले संदेश - नागरिक संभ्रमात, प्रकरणाचा तपास करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...
- मोबाईलवर मात्र लसीकरण झाल्याचे प्राप्त झाले संदेश
- नागरिक संभ्रमात, प्रकरणाचा तपास करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना वॅक्सिनसाठी नोंदणी केल्यावरही अनेक वृद्ध नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. परंतु, मोबाईलवर लसीकरणाची पहिली मात्रा यशस्वीरीत्या लावल्याचा संदेश पाठविला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रमण निर्माण झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव शंकर बी. सुगंध यांच्याकडे ईश्वराबाई भोजवानी (८०), भरत भोजवानी (५६), आशा भोजवानी (५५), अशोक खिलवानी (५७), सिमा खिलवानी (५६) या ज्येष्ठ नागरिकांनी तक्रार केली. जुनी मंगळवारी, बाबा नानक स्कूलच्या मागील परिसरात राहणाऱ्या या नागरिकांच्या घरी महानगरपालिकेचे अधिकारी आले आणि मोबाईलवर कोरोना लसीकरणाबाबत नोंदणी केली. सोबतच बाभुळबन मैदानात लसीकरणाचे शिबिर आयोजित केले असून, तेथे हा नोंदणी क्रमांक दाखवून लसीकरण करण्याचे सांगितले. त्यानुसार हे सर्व नागरिक लसीकरणासाठी बाभुळबन मैदानात पोहोचले. पाच तास रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांना विना लसीकरण परत पाठविण्यात आले. शिबिरातील अधिकाऱ्यांना विचारले असताना लसीकरण केवळ ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठीच असून, तुम्हा सगळ्यांचे वय ६० वर्षाखालील असल्याने तुम्हाला लस दिली जाणार नसल्याचे सांगितले गेले. विशेष म्हणजे, या सर्व ज्येष्ठांपैकी एकाचे वय ८० वर्ष होते. मात्र, त्याच तर्कावर त्यांनाही परत पाठविण्यात आले. शिबिरात असलेल्या चिकित्सकांनी त्यांचा आधार कार्ड स्कॅन होत नसल्याचे कारण सांगून, हात झटकले. त्यामुळे, या सर्व नागरिकांना विना लसीकरण परतावे लागले. मात्र, त्यानंतर शुक्रवारी या सर्व नागरिकांच्या मोबाईलवर, तुम्हाला कोरोना लसीची पहिली मात्र यशस्वीरीत्या देण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला. शिवाय, आपले प्रमाणपत्र सरकारच्या कोविड ॲपवर प्राप्त करू शकता, असेही त्यात लिहिले होते. या संदेशाबाबत या नागरिकांनी बाभुळबन मैदानात जाऊन डॉक्टरांना विचारणा केली असता, त्यांना टाळाटाळ केली. अशा तऱ्हेने ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणाच्या नावाने फसवणूक होत असल्याचा आरोप शंकर सुगंध यांनी लावला आहे.या प्रकरणाचा तपास जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी करावा, अशी मागणी सुगंध यांनी केली आहे.
.........