तडजोडीची किमया घडली अन् २३ दाम्पत्यांची पुन्हा मनं जुळली

By आनंद डेकाटे | Published: September 11, 2023 06:18 PM2023-09-11T18:18:48+5:302023-09-11T18:20:55+5:30

राष्ट्रीय लोकअदालत ५६ हजार प्रकरणांचा निकाल : १४३ कोटी रुपयांचे दावे निकाली

Reunification of 23 families through mutual compromise; 143 crore claims settled | तडजोडीची किमया घडली अन् २३ दाम्पत्यांची पुन्हा मनं जुळली

तडजोडीची किमया घडली अन् २३ दाम्पत्यांची पुन्हा मनं जुळली

googlenewsNext

नागपूर : राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ५६ हजार ८३१ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली आहेत. या प्रकरणांचे एकुण तडजोड मुल्य १४३ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय लोकअदालतीत २३ घटस्फोट व कौटुंबिक वाद प्रकरणांतील पती-पत्नी यांच्यामध्ये आपसी समझोत्याने मनोमिलन होउन पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू झाला.

जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कर्ज वसूली न्यायाधीकरण, सहकार न्यायालय, औद्योगिक व कामगार न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालूका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश जे. पी. झपाटे, जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सचिन पाटील यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १५३ मोटार अपघात दाव्यांमध्ये तडजोड झाल्याने ९ कोटी ८ लाख नुकसान भरपाई प्राप्त झाली तसेच बॅंक व वित्तीय संस्थाकडील १२५ प्रकरणामध्ये तडजोड होउन रुपये ८० कोटी ५७ लाखाची कर्ज वसूली सुद्धा झाली.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी दावे, भुसंपादन प्रकरणे, तडजोडीयोग्य फौजदारी प्रकरणे, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, विद्युत अधिनियमाची प्रकरणे, पराक्रम्य लेख अधिनियम कलम १३८ ची प्रकरणे, कामगार वाद, रक्कम वसुली प्रकरणे आणि इतर दाखलपूर्व प्रकरणे समोपचाराने निपटारा करण्यासाठी ठेवण्यात आली होती. यात पक्षकारांची २९ हजार ९१३ प्रलंबित प्रकरणे व एक लाख १२ हजार ६४९ दाखलपुर्व अशी एकूण १ लाख ४२ हजार ५६२ प्रकरणे आपसी तडजोडीसाठी हाताळण्याकरीता एकूण ४८ पॅनल तयार करण्यात आले होते. पॅनलमध्ये न्यायिक अधिकारी व सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी, वकील व समाजसेवक यांचा समावेश होता.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.आर.पडवळ, जिल्हा न्यायाधीश एम. व्ही देशपांडे, दिवाणी न्यायाधीश डी. बी. म्हालटकर अॅड. सुषमा नालस्कर, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष रोशन बागडे तसेच जिल्हातील सर्व न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, पॅनल सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आदी सहभागी झाले होते.

Web Title: Reunification of 23 families through mutual compromise; 143 crore claims settled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.