त्रिमूर्तीनगर गजानन मंदिरात प्रगट दिन ५ मार्चला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:14 AM2021-03-04T04:14:09+5:302021-03-04T04:14:09+5:30
नागपूर : त्रिमूर्तीनगरातील रेंगे ले-आऊटमधील श्री सदगुरु गजानन महाराज सेवाभावी मंडळातर्फे ५ मार्च रोजी प्रगट दिन महोत्सवाचे आयोजन केले ...
नागपूर : त्रिमूर्तीनगरातील रेंगे ले-आऊटमधील श्री सदगुरु गजानन महाराज सेवाभावी मंडळातर्फे ५ मार्च रोजी प्रगट दिन महोत्सवाचे आयोजन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, गजानन मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्कशिवाय दर्शन करता येणार नाही. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर पाळून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. सॅनिटायझरची व्यवस्था मंदिरातर्फे करण्यात येणार आहे. मात्र, मंदिरातील पादुकांना स्पर्श करता येणार नाही.
प्रगट दिनानिमित्त ५ मार्चला श्रींचा अभिषेक व लघुरुद्र इंदुताई तलमले यांच्या परिवारातर्फे होणार आहे. मंदिर आकर्षक पद्धतीने सजविण्यात येत आहे. आकर्षकरीत्या रोषणाई केली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यंदा दिंडी व पालखी काढण्यात येणार नाही. महाप्रसादाचेही आयोजन केले जाणार नाही. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्यवस्थापनाकडून दर्शनासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून महिला आणि पुरुष असे दोन स्वतंत्र मार्ग, दर्शनादरम्यान मधे कुठेही थांबता येणार नाही, असे आयोजकांनी कळविले आहे.