मनपा तिजोरीत जमा होणारा महसूल घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 08:07 PM2020-07-14T20:07:48+5:302020-07-14T20:09:17+5:30
कोविड-१९ चा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यात शासकीय अनुदानात मोठी कपात करण्यात आल्याने गेल्या तीन महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा महसूल अर्ध्यावर आला आहे. यामुळे अत्यावश्यक खर्च भागवताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. एप्रिल ते जून महिन्यात १६२.९८ कोटींचा महसूल जमा झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ चा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यात शासकीय अनुदानात मोठी कपात करण्यात आल्याने गेल्या तीन महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा महसूल अर्ध्यावर आला आहे. यामुळे अत्यावश्यक खर्च भागवताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. एप्रिल ते जून महिन्यात १६२.९८ कोटींचा महसूल जमा झाला.
एप्रिल महिन्यात मालमत्ता कर, बाजार विभाग, पाणीपट्टी, आरोग्य, नगररचना, यासह विविध विभागांच्या माध्यमातून ७.८३ कोटींचा महसूल जमा झाले. तर ७२.९० कोटी अनुदान मिळाले. मे महिन्यात विविध विभागाच्या वसुलीतून १७.४४ कोटी तर ५२.९७ कोटी शासन अनुदान मिळाले. जून महिन्यात विविध विभागाच्या माध्यमातून २९.९८ कोटी तर ३७.०२ कोटी शासन अनुदान प्राप्त झाले. एप्रिल महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात प्राप्त महसूल अर्ध्यावर आला.
लॉकडाऊनचा फटका
कोविड-१९ ला आळा बसावा यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. शासकीय कार्यालयांसह व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. याचा परिणाम महापालिकेच्या करवसुलीवर झाला. डिमांड वाटपाचे काम ठप्प झाले होते. आॅनलाईन कर भरण्याला अजूनही नागरिकांचा फारसा प्रतिसाद नाही.
जीएसटी अनुदान घटले
राज्य सरकारकडून मनपाला दर महिन्याला ९३ कोटीहून अधिक जीएसटी अनुदान मिळत होते परंतु एप्रिल महिन्यापासून यात कपात करण्यात आली आहे. दर महिन्याला ५३ कोटी अनुदान मिळत आहे. ४० कोटींची कपात केल्याने मनपा प्रशासनापुढे गंभीर समस्या उभी ठाकली आहे. निधी नसल्याने विकास कामे थांबली असून नवीन कामांना मंजुरी देता येत नाही.