महसूल कार्यालय पडले ओस

By admin | Published: July 6, 2017 02:33 AM2017-07-06T02:33:15+5:302017-07-06T02:33:15+5:30

महादुला व कोराडी भागातील सहा तलाठी कार्यालयांतर्गत असलेल्या गावातील महसूल संबंधित कामे गतीने व कमी कष्टाने व्हावी

Revenue department fell dew | महसूल कार्यालय पडले ओस

महसूल कार्यालय पडले ओस

Next

कोराडीवासीयात संताप : नागरिकांची शहराकडे धाव, ‘दोन दिवसाचे धोरण’ नावालाच
लोकमत न्यूज नेटवर्क
कोराडी : महादुला व कोराडी भागातील सहा तलाठी कार्यालयांतर्गत असलेल्या गावातील महसूल संबंधित कामे गतीने व कमी कष्टाने व्हावी, या उद्देशाने कोराडी येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात आले. परंतु महसूल विभागाचे हे कार्यालय आता ओस पडले असून शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर या कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे.
पूर्वी हे कार्यालय दर गुरुवारी सुरू ठेवण्यात येत होते. यावर्षी सोमवार दिवस वाढवून देण्यात आला. परंतु दोन महिन्यांपासून एक सोमवार वगळता या कार्यालयात अधिकारी आलेच नाहीत. शिवाय गुरुवारच्या कार्यातही अखंडता नाही. तीन आठवड्यापासून येथे गुरुवारलाही कुणी अधिकारी आले नसल्याने शेतकरी, विद्यार्थी, पालक व मालमत्ता फेरफार करणाऱ्यांना कागदपत्रांसाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे. या कार्यालयात दररोज तलाठी असणे अपेक्षित असताना अनेकदा तलाठीही उपस्थित राहात नाही. उत्पन्नासारख्या किरकोळ दाखल्यासाठी ८-१० दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. तीन आठवड्यांपासून येथे फक्त आॅपरेटर हजर असतो. सर्व दस्तावेज गोळा करून कामठीला नेले जातात.
पुढील गुरुवारी संबंधित अधिकाऱ्याची स्वाक्षरी करून आणले जातात. त्यामुळे साध्या कागदपत्रासाठीही नागरिकांना आठवडाभर प्रतीक्षा करावी लागते. येथील कार्यालयात गुरुवारी व सोमवारी अधिकारी नियमित येत नसल्याने नागरिकांना कामठी अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. परिणामी शेतकरी, मजुरांना आपल्या पाल्यांसाठी मजुरीचे काम सोडून शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.

मुख्यालयातील कामांमुळे अनियमितता
या काळात ग्रामपंचायत मतदान संदर्भातील व इतर कामांसाठी मुख्यालयात राहणे आवश्यक असल्याने कोराडी येथील कार्यालयात नियमित उपस्थित राहणे शक्य झाले नाही. तलाठ्यांनाही तहसील व उपजिल्हाधिकारी कार्यालयात कामे होती. त्यामुळे दरम्यानच्या काळात सामान्यांना त्रास सहन करावा लागला. परंतु आता ही कामे संपली असून आगामी काळात कोराडी येथे दर गुरुवारी पूर्णवेळ तर सोमवारी किमान अर्धवेळ कामकाजासाठी सर्व तलाठी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
- सुनील तरुडकर, नायब तहसीलदार, कोराडी.

स्टॅम्प व्हेंडरची समस्या कायम
अनेकदा गुरुवारी नायब तहसीलदार आले तरी स्टॅम्प व्हेंडर उपस्थित राहात नाही. दुय्यम निबंधकांनी स्टॅम्प व्हेंडरला कोराडीला उपस्थित राहण्याचे आदेश दिल्यावरही व्हेंडर हजर नसल्याने कामे होत नाहीत. व्हेंडरला या ठिकाणी उपस्थित राहणे परवडत नसल्याचे सांगितले जाते. यावर निबंधकांनी आळीपाळीने सर्व व्हेंडरला कोराडीला उपस्थित राहण्याचे नव्याने आदेश दिले आहेत. सुरुवातीच्या अनुभवानुसार या कार्यालयात दर गुरुवारी मोठी गर्दी असायची. परंतु अधिकाऱ्यांच्या अनियमिततेमुळे नागरिकांनी आता कोराडीऐवजी कामठी व नागपूरला जाऊन कामे करण्यास प्राथमिकता दिल्याने येथील गर्दी कमी होत आहे.
कोराडी कार्यालयात सहा तलाठ्यांसाठी वर्क स्टेशन दिले आहे. परंतु त्यानुसार संगणकीय सुविधा अद्याप मिळाली नाही. बिलाची रक्कम न भरल्याने या कार्यालयाची इंटरनेट सेवा बीएसएनएलने बंद केली. सातबारा व इतर दाखले आॅनलाईन काढण्याची सक्ती आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने गरजूंना खासगी ठिकाणाहून प्रत्येक दाखल्याला ३० रुपये मोजावे लागत आहे. त्यानंतर त्या दाखल्यावर तलाठ्याच्या स्वाक्षरीसाठी धावपळ करावी लागते.

Web Title: Revenue department fell dew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.