रेती वाहतूकदारांना महसूल विभागाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:37+5:302021-02-05T04:38:37+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : रेतीचा अवैध उपसा आणि विना राॅयल्टी वाहतूक अव्याहतपणे सुरू असताना महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी ...

Revenue department hit sand transporters | रेती वाहतूकदारांना महसूल विभागाचा दणका

रेती वाहतूकदारांना महसूल विभागाचा दणका

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : रेतीचा अवैध उपसा आणि विना राॅयल्टी वाहतूक अव्याहतपणे सुरू असताना महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. ३०) सकाळी सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी-खापा मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी अचानक कारवाई करीत रेती वाहतुकीचे १० ट्रक पकडले. हे सर्व ट्रक रेती घेऊन नागपूर शहराच्या दिशेने जात हाेते. यातील बहुतांश ट्रक ओव्हरलाेड असून, ट्रकचालकांकडे वाहनाचे कागदपत्र व रेती वाहतुकीची राॅयल्टी नसल्याचे निदर्शनास आले. ट्रक मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी त्यांना नाेटीस बजावण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार चैताली दराडे यांनी दिली.

कन्हान नदीतील रेतीचा अवैध उपसा आणि रेतीची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक यासाठी सावनेर तालुका कुप्रसिद्ध आहे. या प्रकारातील बारकावे महसूल व पाेलीस विभागातील अधिकाऱ्यांना माहीत असूनही रेतीचाेरीला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्यावतीने ठाेस कारवाई व उपाययाेजना केल्या जात नाही. प्रशासनाच्यावतीने केल्या जाणाऱ्या जुजबी कारवाई व उपाययाेजना रेतीतस्कर व वाहतूकदारांच्या पथ्यावर पडतात.

नायब तहसीलदार चैताली दराडे यांच्या नेतृत्वातील पथकाने शनिवारी सकाळी गस्तीदरम्यान खापा-पाटणसावंगी मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी एमएच-४०/बीएल-७८७३, एमएच-४०/बीजी-६८७४, एमएच-४०/वाय-२१०१, एमएच-३४/एबी-३४११, एमएच-४०/वाय-४९७९, एमएच-४०/बीएल-५१५६, एमएच-४०/एके-७९६९, एमएच-४०/वाय-८९९१, एमएच-४०/वाय-७९ क्रमांकासह अन्य एक ट्रक थांबावून झडती घेतली. कागदपत्रांच्या तपासणीअंती काही ट्रकमधील रेती विना राॅयल्टी हाेती तर काही ट्रक एकाच राॅयल्टीचा वापर करीत दुसऱ्यांदा रेतीची वाहतूक करीत हाेते. काही ट्रकचालकांकडे त्यांच्या ट्रकचे कागदपत्र देखील नव्हते. शिवाय, बहुतांश ट्रक ओव्हरलाेड हाेते.

परिणामी, अधिकाऱ्यांनी सर्व ट्रक ताब्यात घेत यातील पाच ट्रक सावनेर तहसील कार्यालयाच्या आवारात तर पाच ट्रक खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा केले. कागदपत्रांच्या तपासणीअंती दाेषींवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती नायब तहसीलदार चैताली दराडे यांनी दिली.

....

२.५० लाख रुपये दंड

ती रेती साैंसर (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) तालुक्यातील आणली असल्याची माहिती ट्रकचालकांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी पकडलेल्या १० पैकी पाच ट्रकचे मालक शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सावनेर तहसील कार्यालयात पाेहाेचले हाेते. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे, राॅयल्टी व ट्रकमधील रेती याची तपासणी केल्यानंतर त्यांना साेमवारी नाेटीस बजावून दंडात्मक कारवाईबाबत विचारणा केली जाणार आहे. यात जाॅन्टी पांडे, रूपनारायण, राजू वानखेडे, राजेंद्र पौनीकर, निखील भुरकुंडे, अरशद सिद्दिकी या ट्रकमालकांचा समावेश आहे. सर्व ट्रक मालकांकउून प्रति ट्रक २ लाख ५० हजार रुपये दंड वसूल केला जाणार असल्याची कुणकुण लागल्याने ट्रकमालकांमध्ये असंताेष निर्माण झाला आहे.

....

फेब्रुवारीमध्ये रेतीघाटांचा लिलाव

नागपूर जिल्ह्यातील विविध नद्यांवरील रेतीघाटांचे लिलाव आगामी फेब्रुवारी महिन्यात केले जाणार आहे. घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीचाेरीला प्रचंड उधाण आले. त्यातच साैंसर तालुक्यातील ओव्हरलाेड रेती राॅयल्टीसह नागपूर जिल्ह्यात यायला सुरुवात झाली. यात एकाच राॅयल्टीचा वारंवार उपयाेग करून रेती व्यावसायिकांची प्रचंड पैसा कमावला. रेतीचे परीक्षण केल्यास संपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर येऊ शकते. यात नागपूर जिल्ह्यातील रेती तस्करांचे बिंग फुटू शकते. फेब्रुवारीमध्ये घाटांचे लिलाव झाल्यास ते तीन वर्षांसाठी दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईमुळे चार-पाच दिवस रेती वाहतूक बंद राहणार असल्याने रेती व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागणार आहे.

Web Title: Revenue department hit sand transporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.