नागपुरात महसुल कर्मचाऱ्यांचा एल्गार : सामूहिक रजा घेऊन वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 09:02 PM2019-07-10T21:02:42+5:302019-07-10T21:04:10+5:30
आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी मागील तीन दिवसापासून आंदोलन करीत आहेत. बुधवारी त्यांनी सामूहिक रजा आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले. विभागस्तरावर हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी यादरम्यान परिसरात निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी मागील तीन दिवसापासून आंदोलन करीत आहेत. बुधवारी त्यांनी सामूहिक रजा आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले. विभागस्तरावर हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी यादरम्यान परिसरात निदर्शने केली.
नागपूर जिल्हा महसुल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात महसूल विभागांतर्गत तृतीय व चतुर्थ कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ९०० वर आहे. संघटनांनी आज सामूहिक रजा आंदोलनाची हाक दिल्यामुळे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुकास्तरीय तहसील कार्यालय आदी ठिकाणी या आंदोलनाचा फटका सामान्य नागरिकांना बसून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचे सांगण्यात येते. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात आज अनेकांना इन्कम, डोमीसाईल, जात, रहिवासी आदी प्रमाणपत्रे कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेमुळे मिळू शकली नाहीत. खनिकर्म विभागातील कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदविल्यामुळे शासनाच्या महसुलाला फटका बसल्याचेही सांगितले जाते. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र शिदोडकर, सरचिटणीस राजेंद्र ढोमणे, अभिषेक हिवसे, स्नेहल खवले, रसिका झंझाळ, रुख्साना शेख, सतीश सूर्यवंशी, टी.एस. कावडकर, मंगेश जाधव, सुमित पेंदोर, संजय मुडेवार, प्रशांत झाडे, हरीश कोहाड, सुनील ठाकरे, विनोद शेंभेकर, अशोक मडावी, भोजराज बडवाईक, किरण यावलीकर, प्रमोद वराडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
- अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गाची पदे परस्पर अदलाबदलीने भरावी
- पुरवठ्यातील अव्वल कारकून पदावर महसूलच्या कनिष्ठ लिपिकांना तदर्थ पदोन्नती देण्यात यावी
- नागपूर विभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी
- नायब तहसिलदारांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी.
- पदोन्नत नायब तहसिलदारांना नियमित पदांचा कार्यभार देण्यात यावा,
- सेवानिवृत्त होणारे अधिकारी/कर्मचाऱ्यांबाबत ते कार्यरत असलेल्या सर्व ठिकाणांहून मागविण्यात येणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी
आजपासून लेखणी बंद
नागपूर विभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या विभागस्तरावरील न्यायिक मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदन सादर करुन चर्चा करण्यात आली. परंतु विभाग व जिल्हा स्तरावरुन कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मागील ८ जुलैपासून त्यांचे आंदोलन सुरु आहे. गेले दोन दिवस काळ्या फिती लावून ते आंदोलन करीत आहेत. बुधवारी त्यांनी सामूहिक रजा घेऊन आंदोलन केले. उद्या गुरुवार ११ ते १२ जुलै दरम्यान लेखणी बंद आंदोलन केले जाईल आणि त्यानंतरही मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्याास १५ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात करण्यात येईल, असे जिल्हा संघटनचे सरचिटणीस राजेंद्र ढोमणे यांनी सांगितले.