ढिसाळ कारभारामुळे इतवारी रेल्वेस्थानकाचा महसूल बुडतोय ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:11 AM2021-08-24T04:11:51+5:302021-08-24T04:11:51+5:30
नागपूर : रेल्वेस्थानकाच्या आत जाण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट घेणे आवश्यक आहे. परंतु इतवारी रेल्वेस्थानकावर आत जाताना कुणीही प्लॅटफॉर्म तिकीट घेत ...
नागपूर : रेल्वेस्थानकाच्या आत जाण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट घेणे आवश्यक आहे. परंतु इतवारी रेल्वेस्थानकावर आत जाताना कुणीही प्लॅटफॉर्म तिकीट घेत नसल्यामुळे रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची बाब निदर्शनास आली.
इतवारी रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल तसेच स्टेशन व्यवस्थापक कार्यालय आहे. येथून असंख्य प्रवासी प्रवास करतात. रेल्वेस्थानकाच्या आत जाण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट घेणे आवश्यक आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ५० रुपये आहेत. तर इतवारी रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ३० रुपये मोजावे लागतात. परंतु ३० रुपये भरणे टाळण्यासाठी बहुतांश नागरिक प्लॅटफॉर्म तिकीट न घेताच इतवारी रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करतात. अशा नागरिकांना रोखण्यासाठी इतवारी रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर कोणताही रेल्वे कर्मचारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करतात. यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वर्षाकाठी लाखोचे नुकसान होत आहे. सोमवारी ‘लोकमत’ने याबाबत तपासणी केली असता, रेल्वेची एक महिला कर्मचारी मोबाईलवर गप्पा मारत होती. तिला नागरिक विना प्लॅटफॉर्म तिकीट घेता आत कसे येत आहेत याबाबत विचारणा केली असता तिने सध्या कोणतीही रेल्वेगाडी नसल्याचे सांगून तुम्हीही तोपर्यंत बिनधास्त फिरून या, असे अफलातून उत्तर दिले. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
............