महसूल लाखांचा, वेतन कोटींमध्ये
By admin | Published: June 19, 2017 02:05 AM2017-06-19T02:05:14+5:302017-06-19T02:05:14+5:30
सध्या प्रसारमाध्यमांमध्ये २४ बाय ७ चे युग असताना दूरदर्शनचा प्रवास मात्र अद्यापही संथगतीनेच सुरू आहे.
‘दूरदर्शन’ केंद्र ठरतेय पांढरा हत्ती : दिवसभरात केवळ एक तास प्रसारण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या प्रसारमाध्यमांमध्ये २४ बाय ७ चे युग असताना दूरदर्शनचा प्रवास मात्र अद्यापही संथगतीनेच सुरू आहे. नागपूर दूरदर्शनचे दिवसभरात केवळ एक तासच प्रसारण करण्यात येते. विशेष म्हणजे, २०१५-१६ मध्ये वर्षभरात दूरदर्शनचे अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनापोटीच सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च झाला होता. मात्र वर्षभरात केंद्राला प्राप्त होणाऱ्या महसुलाचा आकडा जवळपास साडेसात लाख इतकाच होता. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर दूरदर्शन केंद्राकडे विचारणा केली होती. नागपूर दूरदर्शन केंद्राद्वारे निर्मित कार्यक्रमांचे प्रसारण केव्हा होते, येथील स्टुडिओची कार्यक्रमनिर्मिती क्षमता किती आहे, नागपूर केंद्राच्या तंत्रज्ञानाची प्रसारणक्षमता किती आहे, केंद्रापासून प्रसार भारतीला मिळणारे वार्षिक उत्पन्न, मंजूर व रिक्त पदे तसेच वेतन-भत्त्यांवरील एकूण वार्षिक खर्च इत्यादीबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, आॅगस्ट २०१६ मध्ये नागपूर दूरदर्शन केंद्रातर्फे सायंकाळी ६ ते ७ या कालावधीत कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येते. हे कार्यक्रम ध्वनिचित्रमुद्रित करून प्रसारित करण्यात येतात. या केंद्राची कार्यक्रमनिर्मिती क्षमता प्रति दिन दोन कार्यक्रम इतकी असून, त्याचा पूर्णपणे उपयोग करण्यात येतो, असा दावा केंद्रातर्फे करण्यात आला आहे. केंद्रात १०६ मंजूर पदे आहेत. यापैकी २७ पदे रिक्त आहेत. २०१५-१६ या कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यापोटी ५ कोटी ९७ लाख ५४ हजार ५३२ रुपयांचा खर्च झाला. मात्र या कालावधीत प्रसारभारतीला दूरदर्शन केंद्रापासून अवघा ७ लाख ४७ हजार २५० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. यात सुमारे साडेतीन लाख रुपये तर विविध लिलावातून मिळाले होते.
‘आरएनयू’च उपलब्ध नाही
नागपूर दूरदर्शन केंद्र हे विदर्भातील महत्त्वाचे केंद्र मानण्यात येते. मात्र प्रत्यक्षात या केंद्रावरून बातम्यांचे प्रसारणच होत नाही. या केंद्रात ‘आरएनयू’च (रिजनल न्यूज युनिट) उपलब्ध नाही. त्यामुळे प्रसारणाची सोय नाही.