नागपूर विभागाची महसूल वसुली १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 09:31 PM2018-04-13T21:31:06+5:302018-04-13T21:31:23+5:30
विभागाने महसूल वसुलीत यंदाही शंभरी पार केली आहे. उद्दिष्टापेक्षा सात टक्के जास्त वसुली केली आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याने ११०.५ टक्के वसुली करीत विभागात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विभागाने महसूल वसुलीत यंदाही शंभरी पार केली आहे. उद्दिष्टापेक्षा सात टक्के जास्त वसुली केली आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याने ११०.५ टक्के वसुली करीत विभागात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
वर्ष २०१७-१८ आर्थिक वर्षात विभागात ६३२ कोटी २६ लाखांचा महसूल गोळा झाला. उद्दिष्टाच्या तुलनेत १०७ टक्के वसुली झाली. दुष्काळ आणि जीएसटीमुळे वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र कर्मचाऱ्यांनी मेहनत घेत शेवटच्या टप्प्यात वसुली केली. यामुळे शासनाच्या तिजोरीत भर पडली. गेल्या वर्षीही शंभर टक्के वसुली झाली होती. यंदाही शंभर टक्केचा टप्पा पार पाडण्यात आला. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी वसुलीसाठी विशेष लक्ष दिले होते. सर्व जिल्हाधिकारी यांची नियमित आढावा बैठक घेतली. यात वसुलीकडे लक्ष देत विशेष नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी यांनीही विशेष मेहनत घेतली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेत विशेष मोहीम राबविली. त्यामुळे सर्वाधिक वसुली नागपूर जिल्ह्यात झाली. जिल्ह्यात सर्वाधिक ११०.८५ टक्के म्हणजे २५८ कोटी ८६ लाख १५ हजार रुपयाची वसुली झाली. जमीन महसुलातून २२३ कोटी ७६ लाख, करमणूक करातून ८ कोटी ८८ लाख तर गौण खनिजातून ३९९ कोटी ६१ लाखांचा महसूल मिळाला. गेल्या वर्षीही नागपूर विभागाने शंभर टक्केपेक्षा जास्त उद्दिष्ट गाठत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला होता.
जिल्हा उद्दिष्ट वसुली | ||
नागपूर २३३ कोटी ५३ लाख २५८ कोटी ८६ लाख | ||
वर्धा ६८ कोटी ३० लाख ७१ कोटी ७८ लाख | ||
भंडारा ८८ कोटी ६१ लाख ९१ कोटी ४३ लाख | ||
गोंदिया ४० कोटी २ लाख ४२ कोटी २२ लाख | ||
चंद्र्रपूर १०७ कोटी ८८ लाख ११० कोटी १७ लाख |
गडचिरोली ५२ कोटी ५० लाख ५७ कोटी ७८ लाख |