दोन महिन्यात मुद्रांकापासून ५४.९९ कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:07 AM2021-06-24T04:07:08+5:302021-06-24T04:07:08+5:30
- नागपूर मुद्रांक शुल्क विभाग : रजिस्ट्री पुन्हा वाढल्या नागपूर : नागपूर शहरात घराच्या रजिस्ट्री नोंदणीत पुन्हा वाढ झाल्याचे ...
- नागपूर मुद्रांक शुल्क विभाग : रजिस्ट्री पुन्हा वाढल्या
नागपूर : नागपूर शहरात घराच्या रजिस्ट्री नोंदणीत पुन्हा वाढ झाल्याचे गोळा झालेल्या महसुलावरून दिसून येत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात रजिस्ट्रीच्या माध्यमातून नागपूर मुद्रांक शुल्क विभागाकडे ५४.९९ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. शासनाने चालू आर्थिक वर्षांकरिता सध्या निर्धारित लक्ष्य दिलेले नाही, पण शासनाची लक्ष्यपूर्ती करू, असा विश्वास नागपूर शहरचे सहजिल्हा निबंधक वर्ग-१ (उच्च श्रेणी) रवींद्र मुळे यांनी व्यक्त केला.
गेल्यावर्षी नागपूर शहर विभागाने ६३० कोटींच्या लक्ष्याच्या तुलनेत ६५३ कोटींचा महसूल गोळा करून निर्धारित लक्ष्याच्या ११६.८१ टक्के महसूल गोळा केला. गेल्यावर्षी संपूर्ण लॉकडाऊनमुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात केवळ १४ कोटींचा महसूल नागपूर शहर विभागाला मिळाला होता. गेल्यावर्षी शासनाने सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या चार महिन्यांसाठी मुद्रांक शुल्कात ३ टक्के आणि जानेवारी ते मार्च २०२१ या या तीन महिन्यांसाठी मुद्रांक शुल्कात २ टक्के कपात केली होती. त्यामुळे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या काळात रजिस्ट्रीची संख्या वाढली आणि महसुलाचे लक्ष्यही पूर्ण झाल्याचे मुळे म्हणाले.
चालू आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये ५३५० दस्त नोंदणी व १२.६२ कोटी महसूल तसेच मे महिन्यात ३७५९ दस्त नोंदणी आणि ४२.३७ कोटींचा महसूल मिळाला आहे. जून आणि जुलै महिन्यात मुद्रांक शुल्क कपातीचा फायदा ग्राहक घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन महिन्यात दस्त नोंदणी आणि महसुलात वाढ होणार आहे.
मार्चमधील मुद्रांक खरेदीचा फायदा जून, जुलैपर्यंत होणार
राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्क कपातीचा फायदा जुलैपर्यंत घेण्यासाठी अनेकांनी दस्ताशी जुळलेले मुद्रांक विकत घेतले आहेत. ऑनलाईन खरेदीच्या पद्धतीमुळे कुणी किती मुद्रांक खरेदी केले आणि विभागाला किती महसूल मिळणार, याची आकडेवारी उपलब्ध नाही. पण महसुलाची संख्या कोटींत असून खरी आकडेवारी जुलैअखेरीस पुढे येणार असल्याचे मुळे यांनी स्पष्ट केले. या आकडेवारीतून जानेवारी ते मार्चपर्यंतच्या दोन टक्के मुद्रांक शुल्क कपातीचा फायदा किती जणांनी घेतला, हे दस्त नोंदणीवरून दिसून येणार आहे.