महसूल वसुलीत नागपूर विभाग दुसऱ्या स्थानी

By admin | Published: April 2, 2016 03:23 AM2016-04-02T03:23:34+5:302016-04-02T03:23:34+5:30

नागपूर विभागाने यावर्षी महसुल वसुलीमध्ये बाजी मारली आहे. नागपूर विभागाला ५३२ कोटी ८९ लाख रुपयाच्या ...

Revenue from Vasulat Nagpur Division was in second place | महसूल वसुलीत नागपूर विभाग दुसऱ्या स्थानी

महसूल वसुलीत नागपूर विभाग दुसऱ्या स्थानी

Next

५६१.२० कोटींचे लक्ष गाठले : विभागातील सर्व जिल्ह्यात यश
नागपूर : नागपूर विभागाने यावर्षी महसुल वसुलीमध्ये बाजी मारली आहे. नागपूर विभागाला ५३२ कोटी ८९ लाख रुपयाच्या महसुल वसुलीचे उद्दिष्ट असताना विभागाने तब्बल ५६१ कोटी २० लाख ६७ हजाराची वसुली करीत संपूर्ण राज्यात महसूल वसुलीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. विभागातील सर्व जिल्ह्यांचा यात मोठा वाटा असून सर्वांनीच यंदा १०० टक्केच्यावर वसुली केली आहे, हे विशेष.
विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यासंदर्भात शुक्रवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करतांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नागपूर विभाग हे नेहमीच महसूल वसुलीच्या बाबतीचा चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर राहत असे. परंतु यंदा नागपूर विभागाने बाजी मारली आहे. यात नागपूरसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याने हे शक्य झाले आहे. तसेच तहसीलदार व इतर रिक्त पदे भरल्यामुळे सुद्धा महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करता आले.
नागपूर विभागाला २०१५-१६ या वर्षात एकूण ५३२ कोटी ८९ लाख २४ हजार रुपये इतके महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. नागपूर विभागाने ३१ मार्चपर्यंत ५६१ कोटी २० लाख ६७ हजार रुपये (१०५.३१ टक्के ) इतकी वसुली केली. पहिला क्रमांकावर पुणे विभाग राहिले. त्यांनी १०९ टक्के वसुली केली. तर १०३ टक्के महसूल वसुली करीत नाशिक तिसऱ्या स्थानावर राहिले. अमरावती विभागाने १०० टक्के महसूल वसुली करून चौथे स्थान पटकावले.
नागपूर विभागाचा जिल्हानिहाय विचार केला असता सर्वच जिल्ह्यांनी १०० टक्केच्या वर वसुली केली. नागपूर जिल्ह्याने सर्वाधिक २७४ कोटी ४६ लाख रुपयांची महसूल वसुली केली. टक्केवारीनुसार विचार केला तर गडचिरोलीसारख्या मागासलेल्या जिल्ह्याने विभागात सर्वाधिक १२५.६९ टक्के महसूल वसुली केली. गडचिरोली जिल्ह्याला २४ कोटी ७४ लाख २४ हजार महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्याऐवजी त्यांनी ३१ कोटी ९ लाख ९३ हजार रुपये इतकी वसुली केली. याशिवाय भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांनी कधीच १०० टक्के महसूल वसुली केली नव्हती. त्यांनीसुद्धा यंदा १०० टक्केवर वसुली केली. वर्धा जिल्ह्याला ४९ कोटी ४६ लाखांचे उद्दिष्ट होते. त्यांनी ५१ कोटी १४ लाख ७० हजाराची वसुली केली. भंडारा जिल्ह्याला ६० कोटी ५८ लाखांचे उद्दिष्ट होते. त्याने ६० कोटी ६२ लाख ७९ हजाराची वसुली केली. गोंदियाला २४ कोटी ७४ लाखांचे उद्दिष्ट होते. त्याने २८ कोटी ९९ लाख ५७ हजारांची वसुली केली. चंद्रपूरला ९८ कोटी ९१ लाखांचे उद्दिष्ट होते. त्याने ११० कोटीची वसुली केली. (प्रतिनिधी)

Web Title: Revenue from Vasulat Nagpur Division was in second place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.