कलाकृतीचा आनंद व्यक्त करण्यासाठीच समीक्षा

By admin | Published: November 12, 2014 12:55 AM2014-11-12T00:55:12+5:302014-11-12T00:55:12+5:30

अखिल भारतीय आणि विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे एखाद्या पारितोषिकासारखेच आहे. पण हा सन्मान मिळावा म्हणून मी लेखन केले नाही. लेखनामागे तो उद्देशही नव्हता.

Review to enjoy the artwork | कलाकृतीचा आनंद व्यक्त करण्यासाठीच समीक्षा

कलाकृतीचा आनंद व्यक्त करण्यासाठीच समीक्षा

Next

अक्षयकुमार काळे : ६४ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार
नागपूर : अखिल भारतीय आणि विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे एखाद्या पारितोषिकासारखेच आहे. पण हा सन्मान मिळावा म्हणून मी लेखन केले नाही. लेखनामागे तो उद्देशही नव्हता. लिहिल्याशिवाय राहावत नाही म्हणून प्रत्येक साहित्यिक लिहितो. समीक्षकाचीही तीच भावना असते. आतापर्यंत कलाकृतींचे समीक्षण केले, पण तत्पूर्वी रसिक म्हणून त्या कलाकृतीचा आनंदही घेतला. या कलाकृतींचा आनंद व्यक्त करण्यासाठीच समीक्षा लिहिली आणि समीक्षा त्यासाठीच असते, असे मत सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केले.
वरुड परिसर मित्र परिवार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, गिरीश गांधी प्रतिष्ठान, स्नातकोत्तर मराठी विभाग माजी विद्यार्थी संघटना, आकांक्षा प्रकाशन आणि मित्र परिवाराच्यावतीने विदर्भ साहित्य संमेलनाच्या आगामी ६४ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. अक्षयकुमार काळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी तर प्रमुख अतिथी म्हणून अजय पाटील, बाळ कुळकर्णी, अरुणा सबाने, अनिल नितनवरे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे पार पडला. डॉ. काळे म्हणाले, समीक्षक काव्याचा, कलाकृतीचा आस्वाद घेऊ शकत नाही, असे काहींना वाटते पण समीक्षेसाठी प्रथम रसिक होता आले पाहिजे. रसिक म्हणून कलाकृतीचा आस्वाद घेता येणे, हीच समीक्षेची अट आहे. कवीच्या आयुष्यातही अनेक संघर्ष असतात, पण कलाकृतीच्या निर्मितीच्या धुंदीत ते गळून पडतात. समीक्षक निर्मिती करीत नसला तरी कलेचा आनंद व्यक्त करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तोच आनंद मी व्यक्त केला आहे. कलाकृतींचे सारतत्त्व समजून ते वाटण्याचा आणि त्याचा आस्वाद पोहोचविण्याचा माझा प्रयत्न राहिला. त्यातच खरा आनंद आहे. संमेलनाध्यक्षपद मिळाले याचे समाधान आहेच, असे ते म्हणाले.
याप्रसंगी गिरीश गांधी म्हणाले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करणे असो वा एखाद्या कलाकृतीवर बोलणे असो; अक्षयकुमार काळे यांनी आपल्या अभ्यासाने आणि वाणीने अनेकांना जिंकून घेतले आहे. महाराष्ट्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. अशा योग्य व्यक्तीला संमेलनाध्यक्षपदी आरूढ होण्याचा मान मिळतो, ही आनंदाची बाब आहे. एरवी प्राध्यापक मंडळी काम टाळत असताना राष्ट्रसंतांचे अध्यासन आवडीने ते चालवीत आहेत.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात त्यांच्या वडिलांचे मोठे स्थान आहे. वडिलांनी वाचनासाठी आणि शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे अक्षयकुमार काळे घडले. याप्रसंगी त्यांचे वडील असते तर त्यांच्या संमेलनाध्यक्ष होण्याचा आनंद त्यांना झाला असता. त्यांच्या हातून अधिक लिखाण होवो आणि अधिकाधिक चांगले कार्य होवो, अशा शुभेच्छा गांधी यांनी काळे यांना दिल्यात.
याप्रसंगी रमेश बोरकुटे, अनिल नितनवरे, अजय पाटील, अरुणा सबाने, ज्ञानेश्वर रक्षक, बाळ कुळकर्णी, तीर्थराज कापगते यांनीही डॉ. अक्षयकुमार काळे यांचा गुणगौरव केला. कार्यक्रमाचे संचालन मनीषा साधू यांनी तर आभार डॉ. कोमल ठाकरे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Review to enjoy the artwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.