धामणा येथे आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:09 AM2021-05-08T04:09:48+5:302021-05-08T04:09:48+5:30
धामणा : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (दि. ६) दुपारी आढावा बैठक घेण्यात आली. यात व्याहाड सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावांमधील ...
धामणा : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (दि. ६) दुपारी आढावा बैठक घेण्यात आली. यात व्याहाड सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावांमधील काेराेना संक्रमणावर चर्चा करून उपाययाेजनांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीत धामणा, पेठ, व्याहाड, शिवा, सावंगा, बाजारगाव, सातनवरी, शिरपूर भुयारी या गावांमधील काेराेना संक्रमण, ते राेखण्यासाठी केलेल्या व करावयाच्या उपाययाेजना, काेराेनाचे ॲक्टिव्ह रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृतांचा आकडा, आराेग्य व पंचायत विभागाकडून केल्या जात असलेल्या उपाययाेजना, काेराेना प्रतिबंधक लसीकरण यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विचारविमर्श करण्यात आला. ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काेराेना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्याने मनात भीती न बाळगता किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता प्रत्येकाने काेराेना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. धामणा व परिसरातील गावांमधील काेराेना संक्रमित रुग्णांनी १४ दिवस गृहविलगीकरणात राहून काळजी घ्यावी तसेच सर्दी, खाेकला, ताप व तत्सम लक्षणे आढळून आल्यास काेराेना चाचणी करवून घेण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला. दुसरीकडे, या भागातील वाढते काेराेना रुग्ण लक्षात घेता धामणा येथे १० खाटांचे काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद सभापती भारती पाटील, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, खंडविकास अधिकारी जाधव, पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, सरपंच वंदना थुटूरकर, उपसरपंच मनोहर येलेकर, राजकुमार पारधी, मंडळ अधिकारी माहुरकर, कुंदा सहारे, आकाश गजबे, सुनंदा सातपुते, प्रा. नंदेश तागडे, धनंजय जीवतोडे, अंगणवाडीसेविका, आशासेविका, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी व नागरिक उपस्थित हाेते. संचालन सुनील जोशी यांनी केले, तर राजकुमार पारधी यांनी आभार मानले.