कुटुंब अवलंबून असलेल्या आरोपीची शिक्षा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:50+5:302021-09-06T04:11:50+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कुटुंब अवलंबून असलेल्या आणि गुन्हेगारी प्रवृत्ती नसलेल्या आरोपीला सुधारण्याची संधी देण्यासाठी त्याची ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कुटुंब अवलंबून असलेल्या आणि गुन्हेगारी प्रवृत्ती नसलेल्या आरोपीला सुधारण्याची संधी देण्यासाठी त्याची दारुबंदी कायद्यांतर्गतची शिक्षा रद्द केली, तसेच त्याच्या वागणुकीवर दोन वर्षापर्यंत लक्ष ठेवण्याचे निर्देश परिविक्षा अधिकाऱ्याला दिले. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.
कमलेश ठोंबरे असे आरोपीचे नाव असून तो चंद्रपूर येथील रहिवासी आहे. २०१५ मध्ये त्याच्याकडे १८० मिली दारूच्या दोन बॉटल आढळून आल्या होत्या. त्यावरून तो दारू विक्रीचा व्यवसाय करीत नसावा. त्याने स्वत:साठी ही दारु खरेदी केली असावी असे दिसून येत असल्याचे मत न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले. याशिवाय, आरोपीला पत्नी व दोन मुले असून एक मुलगा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. ही बाबही आरोपीला दिलासा देताना विचारात घेण्यात आली. १० मे २०१८ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. २९ ऑगस्ट २०१९ रोजी सत्र न्यायालयाने या शिक्षेविरुद्धचे अपील खारीज केले होते. त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आरोपीच्यावतीने ॲड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.