बंडाचा झेंडा कायम

By admin | Published: February 8, 2017 03:00 AM2017-02-08T03:00:15+5:302017-02-08T03:00:15+5:30

पक्षाच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतर, मनधरणी केल्यानंतर काही प्रभागात बंडोबा शेवटी थंडोबा झाले.

The revolt flag continues | बंडाचा झेंडा कायम

बंडाचा झेंडा कायम

Next

मैंद यांचे भाजपाविरोधात ‘पॅनल’ : जोशी, रिसालदार, पातूरकर, सेनाड रिंगणातच

नागपूर : पक्षाच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतर, मनधरणी केल्यानंतर काही प्रभागात बंडोबा शेवटी थंडोबा झाले. उमेदवारी मागे घेतली. मात्र, काहींनी त्यानंतरही बंडाचा झेंडा कायम ठेवत पक्षातीलच उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. निवडणुकीत या बंडोबांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असेल. एकीकडे ‘डॅमेज कंट्रोल’मध्ये यश आले असतानाच प्रभाग १५ मध्ये मात्र पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.

विशाखा जोशी यांनी बंड केले असतानाच विद्यमान नगरसेविका विशाखा मैंद यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. पक्षनेत्यांच्या सूचना झुगारून त्यांनी प्रभाग-१५ मध्ये ‘पॅनल’ उभारले आहे. या ‘पॅनल’मध्ये राजेश जरगर, त्रिवेणी तिवारी व अ‍ॅड.प्रदीप अग्रवाल यांचा समावेश आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता हा निर्णय आम्ही घेतला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळालीच पाहिजे. उमेदवारी मागे घ्यावी यासाठी आमदारांचेदेखील फोन आले. मात्र आम्ही निर्धारावर कायम आहो, असे मैंद यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संघ परिवारातीलच चार जणांनी मात्र अर्ज मागे घेण्यास नकार देत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. यात प्रभाग १५ मधून शिवसेनेच्या तिकिटावर लढत असलेल्या विशाखा जोशी, प्रभाग १६ मधून अपक्ष उतरलेले प्रसन्न पातुरकर, प्रभाग १९ मधून अपक्ष लढणारे श्रीपाद रिसालदार व प्रभाग ३१ मधून बसपाच्या तिकिटावर लढणारे अतुल सेनाड यांचा समावेश आहे. श्रीपाद रिसालदार यांनी प्रभाग-१९ मध्ये सुनील श्रीवास यांच्या सोबतीने ‘पॅनल’ तयार केले आहे. प्रभाग १२ मध्ये भाजपा व काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आहे. माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांना काँग्रेसने प्रभाग १४ मध्ये तिकीट दिल्यानंतरही प्रभाग १२ मध्ये त्यांच्या मातोश्री नगरसेविका मीना चौधरी या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी तर एकत्र येत पॅनलच तयार केले आहे. भाजपच्या मातंग समाज सेलच्या जिल्हाध्यक्ष उषा अडागळे (अनुसूचित जाती महिला), युवा मोर्चाच्या पिंकू मारुती वाळवे (जमाती महिला), प्रभाग १२ चे सहसंयोजक तसेच जुन्या प्रभाग २३ चे दोनदा अध्यक्ष व वॉर्ड १४ चे अध्यक्ष राहिलेले ज्ञानेश्वर साव (ओबीसी ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हजारीपहाड नगरसेवा प्रमुख व भाजपाचे बूथ प्रमुख, तीन वेळचे मंडळ उपाध्यक्ष, वनवासी कल्याण आश्रम, बजरंग दल आदींमध्ये काम केलेले शिवपाल सिंह (सर्वसाधारण) यांनी भाजपा विरोधात दंड थोपटले आहेत. सर्वसाधारण प्रभागात पश्चिम नागपूरचे माजी महामंत्री अशोक डोर्लीकर यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. डोर्लीकर यांनी दोन महिन्यांपूर्वीच भाजपला तसा इशारा दिला होता.

प्रभाग ११ मध्ये नगरसेवक अरुण डवरे हे काँग्रेसचे तिकीट कटल्यामुळे तर भाजपचे पदाधिकारी नामदेव भोरकर हे देखील अपक्ष म्हणून लढत आहेत. काँग्रेसच्या झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष राम कळंबे यांच्या पत्नी सनिता या बसपाकडून रिंगणात आहेत. नगरसेवक महेंद्र बोरकर हे प्रभाग १ मधून काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: The revolt flag continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.