नागपुरात दोन लेस्बियन तरुणींनी उचलले क्रांतिकारी पाऊल; केला साक्षगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 07:00 AM2021-12-31T07:00:00+5:302021-12-31T07:00:07+5:30
Nagpur News एकमेकींवर नितांत प्रेम करीत असलेल्या दोन तरुणींनी सोबत राहण्याचा निर्धार करीत, कमिटमेंट रिंग सेरेमनी, म्हणजे एक प्रकारच्या साक्षगंध सोहळ्यात परस्परांना अंगठ्या घालीत आपल्या सहवाटचालीवर शिक्कामोर्तब केले.
वर्षा बाशू
नागपूर: एकमेकींवर नितांत प्रेम करीत असलेल्या दोन तरुणींनी सोबत राहण्याचा निर्धार करीत, कमिटमेंट रिंग सेरेमनी, म्हणजे एक प्रकारच्या साक्षगंध सोहळ्यात परस्परांना अंगठ्या घालीत आपल्या सहवाटचालीवर शिक्कामोर्तब केले. एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायो, ट्रान्सजेंडर) ग्रूपच्या काही मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत अगदी अलीकडेच पार पडलेल्या या सोहळ्यात या दोघींनी आपल्या प्रेमाला समाजासमोर व्यक्त करून एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे.
गेल्या काही काळापासून एलजीबीटी समुदायाचे अस्तित्व मोकळ्या मनाने स्वीकारण्याबाबत समाजाचा कल वाढताना दिसतो आहे. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये गे व ट्रान्सजेंडर्स मोठ्या हुद्यांवर काम करत आहेत. नागपुरातील एक ट्रान्सजेंडर ही भारतातील पहिली ट्रान्स नर्स म्हणून ओळखली जाते आहे. आपला पारंपरिक व्यवसाय बाजूला ठेवत, एलजीबीटी समुदायातील अनेक सदस्य हे आधुनिक व प्रगत मार्गांवरून पुढे येताना दिसत आहेत.
अशातच नागपुरात झालेला हा साक्षगंध या समुदायाने अजून एक मोठे क्रांतिकारी पाऊल टाकल्याची साक्ष देणारा ठरला आहे.
साक्षगंध झालेल्या दोघी तरुणी उच्चविद्याविभूषित आहेत. त्या दोघीही नामांकित संस्थांमध्ये उच्चपदावर काम करत आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीही उच्च शिक्षित व प्रगत अशी आहे.
या दोघींची भेट एक वर्षापूर्वी झाली होती. या वर्षभराच्या काळात त्या दोघींना आपण एक दुजे के लिये असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी मग एकत्र राहण्याचा निश्चय केला. त्यांच्या या निर्णयाचे त्यांच्या घरच्यांनी मोकळेपणाने स्वागत केल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या लेस्बियन असण्याबाबत काही वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांना जेव्हा प्रथम कळले तेव्हा त्यांना थोडा धक्का बसला होता. मात्र आधुनिक विचारांचा वारसा घेतलेल्या या कुटुंबीयांनी आपल्या मुलींना पूर्णपणे समजावून घेत, त्यांना केवळ स्वीकारलेच नाही तर त्यांना उच्चशिक्षण देऊन स्वयंपूर्णही बनवले. आणि आज त्यांच्या या नात्यालाही मान्यता देत स्वीकारले आहे.
या तरुणींपैकी एक तरुणी दुसऱ्या राज्यातील आहे. असाच कमिटमेंट रिंग सोहळा तिच्याही गावी लवकरच होणार आहे. भविष्यात डेस्टिेनेशन वेडिंगचाही त्यांचा मानस आहे.