रेवतकर, जाजू यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:13+5:302021-01-23T04:10:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. के.जी. रेवतकर तसेच जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संतोष जाजू यांची या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. २६ जानेवारी रोजी दीक्षांत सभागृहात प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या शिक्षकांना सन्मानित करण्यात येईल.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला होता. त्यामुळे विद्यापीठाने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली नव्हती. या पुरस्कारांची आता घोषणा करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठात दरवर्षी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदा यात उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट संशोधक व उत्कृष्ट लेखक या पुरस्कारांचा समावेश आहे. वर्धा येथील बजाज विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओम महोदया यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार घोषित झाला आहे. तर नागपूर विद्यापीठाच्या औषध विज्ञानशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. निशिकांत राऊत व पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. सुभाष कोंडावार यांना उत्कृष्ट संशोधक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हिंगणा येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आरती मोगलेवार यांना डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्णपदक प्रदान करण्यात येईल. याशिवाय त्याच महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गणेश चव्हाण यांचा उत्कृष्ट लेखक म्हणून सन्मानित करण्यात येईल. विधिसभा सदस्य व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय मुनिश्वर यांनादेखील गौरविण्यात येईल.
कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे हेदेखील उपस्थित राहतील, अशी माहिती कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी दिली आहे.