हैदराबादी तरुणांकडून नागपूरची रेकी

By admin | Published: December 27, 2015 03:13 AM2015-12-27T03:13:11+5:302015-12-27T03:13:11+5:30

इसिसच्या वाटेवर असलेले अब्दुल बासित, सय्यद ओमर हुसेन आणि माज हसन फारूख हे तिघे स्वत:सोबत इसिसच्या सूत्रधारांना ‘नागपूरची रेकी‘ भेट देणार होते,

Reykjavik of the Hyderabadi youth | हैदराबादी तरुणांकडून नागपूरची रेकी

हैदराबादी तरुणांकडून नागपूरची रेकी

Next

संवेदनशील स्थळांची पाहणी : इसिसच्या सूत्रधारांना देणार होते भेट
नागपूर : इसिसच्या वाटेवर असलेले अब्दुल बासित, सय्यद ओमर हुसेन आणि माज हसन फारूख हे तिघे स्वत:सोबत इसिसच्या सूत्रधारांना ‘नागपूरची रेकी‘ भेट देणार होते, अशी शंका घेणारा खळबळजनक घटनाक्रम प्राथमिक चौकशीतून उघड झाला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नागपूर ते श्रीनगर, तेथून पाकिस्तान आणि त्यानंतर सिरिया गाठण्याच्या तयारीत असलेल्या या तिघांनी सुमारे १३ तास नागपुरात घालवले. पकडले गेल्यानंतर त्यांनी नागपुरातील वास्तव्यादरम्यानचा घटनाक्रम उघड केला. तिघेही देत असलेली विसंगत अन् लपवाछपवी करणारी माहिती तपास यंत्रणांना अस्वस्थ करणारी ठरली आहे.
हैदराबादहून गुरुवारी रात्री टॅक्सीने निघालेले अब्दुल बासित, सय्यद ओमर हुसेन आणि माज हसन फारूख शुक्रवारी दुपारी १.३० वाजता नागपुरात पोहचले. आल्याआल्याच त्यांनी सीताबर्डीत जेवण घेतले. नंतर किरकोळ खरेदी केल्यानंतर दुपारी ३ ते ६ दिलवाले हा चित्रपट बघितला. त्यानंतर शहरातील विविध भागात फिरून अनेक संवेदनशील स्थळांची पाहाणी केली. कपडे, सुकामेवा आणि अन्य काही चिजवस्तू खरेदी केल्या. रात्री ९ ते १२ असा पुन्हा एक इंग्रजी सिनेमा बघितला. त्यानंतर रेल्वेस्थानक गाठून जेवण वगैरे केल्यानंतर त्या परिसरात फेरफटका मारला. पूर्ण वेळ ते खासगी वाहनाने फिरत होते. पहाटे ३ सुमारास ते विमानतळावर पोहचले.

तिघांचाही आॅनलाईन शोध

नागपूर : तीन तरुणांचा शोध घेताना सुरक्षा यंत्रणांनी त्यांचे मोबाईल, फेसबुक, ई-मेल, व्हॉटस्अ‍ॅप तपासणे सुरू केले. या तिघांचेही मोबाईल स्वीच्ड आॅफ होते. मात्र, मोबाईल आॅफ करताना त्यांनी नागपूर विमानतळावरून विमानाचे श्रीनगरपर्यंत तीन तिकीट बुक केल्याचे उघड झाले. ते नागपूरहून इंडिगोच्या विमानाने इंदोर, दिल्लीमार्गे श्रीनगरला जाणार होते.
सकाळी ८.१५ ला हे विमान नागपूर विमानतळावरून इंदोरकडे झेपावते. त्यामुळे पूर्वनियोजित योजनेनुसार हे तिघे पहाटे ३ च्या सुमारास विमानतळावर आले.
परंतु तपास अधिकाऱ्यांना आॅनलाईन एअर बुकिंगचा महत्त्वपूर्ण धागा हाती लागल्याने त्यांना जेरबंद करता आले. पुन्हा त्यांची सिरियाची वाट रोखण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. (प्रतिनिधी)

घरवापसीनंतरही मिशन सुरूच
सधन परिवारातील सदस्य असलेले हे तिघेही उच्चशिक्षित आहेत. बासित बीटेक फायनलचा विद्यार्थी आहे. ओमर बीएससी मायक्रोलॉजी (फायनल) तर माज बीईचा विद्यार्थी आहे. मात्र, ते इसिसच्या पुरते प्रभावात आहेत. बासित आणि माज तसेच त्यांचे दोन साथीदार असे चौघे चार महिन्यांपूर्वीच सिरियात जाणार होते. पश्चिम बंगाल, पाकिस्तानमार्गे ते सिरियात जाण्याच्या तयारीत असताना कोलकाता विमानतळावर त्यांना पकडण्यात आले होते. घरवापसीनंतर हैदराबाद सीआयटीने त्यांचे समुपदेशन केले होते. चारपैकी दोघे मागे फिरले. मात्र, बासित आणि फारुख यांच्या डोक्यातून इसिसचे भूत काही उतरले नाही. त्यांनी ‘त्या दोघांचा’ नाद सोडून ओमरला आपल्या ‘मिशन इसिस‘मध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर घरच्यांना गुंगारा देऊन गुरुवारी सायंकाळी गायब झाले.

मोबाईल रस्त्यात फेकले

इसिसचे भूत मानगुटीवर बसल्यामुळे अत्यंत तल्लख बुद्धीचे बासित आणि माज आपल्या बुद्धीचा भलत्याच कामासाठी वापर करीत असल्याचे दुसऱ्यांदा उघड झाले आहे. मोबाईल ट्रॅकिंगवरून आपला माग काढला जाऊ शकतो, हे ध्यानात घेत त्यांनी आपले मोबाईल स्वीच्ड आॅफ करून रस्त्यात फेकून दिले. मात्र, तपास यंत्रणा आपल्या एक पाऊल पुढे आहे. हे त्यांना पकडले गेल्यानंतर लक्षात आले.

श्रीनगरात ‘आका‘
आपण श्रीनगरला पोहचल्यानंतर तेथे आपले भव्य स्वागत होणार होते. तेथून पुढची सर्व व्यवस्था ‘आका‘च करणार होते, असे या दोघांनी प्राथमिक चौकशीत सांगितल्याचीही माहिती आहे. श्रीनगरातील स्वागतकर्ते अन् ‘आका‘ अर्थातच इसिसचे सदस्य असल्याचा अंदाज सुरक्षा अधिकाऱ्यांनी काढला आहे.

Web Title: Reykjavik of the Hyderabadi youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.