नागपुरातून चीनला जाणार तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:26 AM2018-09-28T11:26:16+5:302018-09-28T11:27:53+5:30
नागपूरचा बिगर बासमती तांदूळ पहिल्यांदाच चीनला मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टच्या नावा-शेवा टर्मिनलवरून २९ सप्टेंबरला जहाजाने रवाना होणार आहे.
मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचा बिगर बासमती तांदूळ पहिल्यांदाच चीनला मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टच्या नावा-शेवा टर्मिनलवरून २९ सप्टेंबरला जहाजाने रवाना होणार आहे. मौदाच्या नागपूर रोडवरील मारोडी येथील श्रीराम फूड इंडस्ट्रीज लिमिटेड हे तांदळाचे निर्यातक आहे. देशातून पहिल्यांदा चीनला तांदूळ निर्यात होत आहे. ही नागपूरसाठी अभिमानाची बाब आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील क्विंदाओला येथे यावर्षी ९ जूनला भेट दिली होती. यावेळी उभय देशातल्या संबंधित खात्यांमध्ये यासंदर्भात करार झाला होता. त्यानुसार चीनच्या आॅईल व फूड कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी श्रीराम फूड इंडस्ट्रीजच्या मारोडी येथील राईस मिलला भेट देऊन मिलची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी मिलची उपकरणे आणि प्रक्रियेवर समाधान व्यक्त करून तांदळाच्या निर्यातीवर शिक्कामोर्तब केले. तेव्हाच चीनला तांदूळ निर्यातीसाठी द्वार खुले झाले होते. त्यानंतर चीनकडून इंडस्ट्रीजला तांदूळ निर्यातीची परवानगी मिळाली. प्रायोगिक तत्त्वावर इंडस्ट्रीजतर्फे १०० टन बिगर बासमती तांदूळ चीनला पाठविण्यात येणार आहे.
श्रीराम फूड इंडस्ट्रीजने १९ सप्टेंबरला १०० टन तांदूळ रेल्वेद्वारे चार कंटेनरने (प्रत्येकी २५ टन) मुंबईला पाठविण्यात आले. चारही कंटेनर २८ सप्टेंबरला सकाळी जहाजाने चीनला रवाना होतील. भविष्यातही चीनकडून आॅर्डर मिळण्याची शक्यता इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. अनुप गोयल हे इंडस्ट्रीचे संचालक असून ते देशातील सर्वात मोठे तांदूळ निर्यातक आहेत.
या इंडस्ट्रीजतर्फे दरवर्षी वेस्ट आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये तांदळाची नियमित निर्यात करण्यात येते. इंडस्ट्रीजच्या आधुनिक प्रकल्पात महिन्याला धानापासून १५ हजार टन तांदूळ तयार करण्यात येतो.